मोंढाळा येथील एका विहिरीत अज्ञातांनी टाकले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 07:34 PM2018-10-08T19:34:44+5:302018-10-08T19:35:46+5:30
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
यावर्षी भुसावळ तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. मोंढाळे येथे तर तालुक्यातून सर्वात जास्त भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त छापले आहे.
अशा परिस्थितीत मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांनी शेतीच्या उत्पन्नावर पाणी सोडून त्यांचे मोंढाळा व शिंदी या रस्त्यावरील शेतातील विहीर गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. याच विहिरीजवळ दीपक परदेशी यांनी गेल्या १० ते १२ वर्षांपासून गुरांना पाणी पिण्यासाठी स्वखर्चाने हौद बांधून दिला आहे.
या हौदाचा वापर मोंढाळेसह शिंदी येथील गुरांना उपयोग होत आहे. दररोज सुमारे ३०० ते ४०० गुरे या हौदावर पाणी पीत असल्याची माहिती दीपक परदेशी यांनी दिली. या रस्त्यावरून येणारे व जाणारे प्रवासी तसेच परिसरातील शेतकरी यांना उपयोग होत आहे.
अशा परिस्थितीत काही अज्ञात समाजकंटक व्यक्तीने रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास विहिरीत विष टाकण्याचा प्रयोग केल्यामुळे शिंदी, मोंढाळा व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
परदेशी हे सायंकाळी सहा वाजेनंतर शेतात गेले. शेतातील विहिरीतील पाणी हे पांढऱ्या रंगाचे दिसायला लागले व तेथे वासही येऊ लागला. त्यामुळे त्यांना विहिरीत कीटकनाशक टाकल्याचा संशय आला.
दरम्यान, परदेशी यांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क केला. मात्र पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या बंदोबस्तासाठी अडकले आहे. त्यामुळे उद्या मंगळवार, ९ रोजी पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे.