वाळू व्यावसायिकाच्या धमकीमुळे तरुणाने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:58+5:302021-09-26T04:19:58+5:30
जळगाव : वाळूच्या वाहनामुळे लहान मुलांना त्रास होतो, ते रात्रभर झोपत नाहीत त्यामुळे या मार्गाने वाहतूक करु नका असे ...
जळगाव : वाळूच्या वाहनामुळे लहान मुलांना त्रास होतो, ते रात्रभर झोपत नाहीत त्यामुळे या मार्गाने वाहतूक करु नका असे सांगायला गेलेल्या संदीप देवचंद सोनवणे (वय ३१) या तरुणाला वाळू व्यावसायिकाने घरी येवून पिस्तूलाच्या गोळ्या झाडून ठार मारेल अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता देऊळवाडे, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत संदीप सोनवणे याचा भाऊ प्रदीप सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई, वडील, पत्नी, मुले तसेच भाऊ असे एकत्र वास्तव्यास आहोत. शेतमजुरी करुन त्यावर आमचा उदनिर्वाह चालतो. घराच्या शेजारीच काही जण वाळूचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर असून त्याच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो. यामुळे लहान मुले झोपत नाहीत. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या मार्गाने ट्रॅक्टर न्या, असे संदीप याने सकाळी दहा वाजता वाळू व्यवसाय करणाऱ्या दोघांना सांगितले. या दोघांना त्याचा राग आल्याने त्यांनी घरी येऊन संदीपला तसेच त्याची आई व वडिलांसह भावाला शिवीगाळ केली. आमच्या नांदी लागू नका, नाहीतर बंदुकीने गोळ्या झाडून ठार मारीन अशी धमकी दिली.
धमकीमुळे संदीप बाहेर लपला
या धमकीमुळे घाबरलेला संदीप हा दिवसभर मित्राच्या घरी लपून बसला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरी परतला, तेव्हा घरात कोणीच नव्हते. तर वडील बाहेर अंगणात होते. तेव्हा त्याने विष प्राशन केले. वडील देवचंद घरात आले असता, त्यांना संदीपने फवारणीचे औषध प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतरही वाळू व्यावसायिक घरी जावून शिवीगाळ करत असल्याची माहिती संदीपचा भाऊ प्रदीप सोनवणे याने दिली. दरम्यान घटनेने कुटुंबिय कमालीचे धास्तावले आहेत.
कोट..
रुग्णालयातून एमएलसी आल्यावर कर्मचारी गेले होते. संबंधित तरुण जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे त्याची नेमकी काय तक्रार आहे, ते स्पष्ट झालेले नाही. शुध्दीवर आल्यानंतर जसा जबाब देईल त्यानुसार कारवाई केली जाईल.
-रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक