लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:10 PM2021-02-17T23:10:48+5:302021-02-17T23:11:32+5:30
कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव/ कढोली ता. एरंडोल : कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. यामध्ये पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन जण गंभीर आहेत. सायंकाळच्या सुमारास उपकेंद्रात रुग्णाची रांग लागली होती.
कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या झालेल्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. दिवसभर गावातील काही नागरिकांना हा त्रास जाणवला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली.
हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना कळविला. त्यांनी तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती देऊन, कढोली गाठले. काही वेळातच रिंगणगाव येथुन सहा डॉक्टर व दहा नर्सचे पथक येऊन त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात अति प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले.
तर अन्नातूनच विषबाधा झाल्याचा संशय
यावेळी डॉक्टरांनी गावातील नागरिकांना झालेल्या त्रासाची कारणे विचारली असता, त्यांनी लग्नात जेवल्यामुळेच हा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. गावातील अनेकांन पोटदुखीचा व जुलाबाचा त्रास जाणवत असल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले. विषबाधा झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी ही माहिती दिली. मंगलाबाई गोकुळ बडगुजर यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
२२ तासांनी त्रास सुरु
लग्नात जेवण झाल्यानंतर २२ तासाने हातपाय दुखणे थंडीताप व डोकेदुखी चक्कर आल्याने खाजगी डॉक्टरांकडून उपचार केला, असे कृष्णा बडगुजर यांनी सांगितले. लग्नासाठी पिंप्री ता. धरणगाव येथील सोमनाथ बडगुजर या स्वयंपाकीला बोलावण्यात आले होते, अशी माहिती मिळाली.