चाळीसगावातील पोळा..अन् मानाचे नारळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:39 PM2017-08-20T12:39:45+5:302017-08-20T12:41:31+5:30
परंपरा : बहाळ दरवाजातून फुटतो पोळा
ऑनलाईन लोकमत / जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जळगाव, दि. 20 - अनेकविध सांस्कृतिक पदर असणा:या चाळीसगावात सण-उत्सवाच्या परंपराही आहेत. विशेष म्हणजे त्या तेवढय़ाच जोशपूर्ण व उत्साही वातावरणात जपल्या जातात. पोळा आणि मानाचे नारळ..ही अशीच एक परंपरा. पोळ्याच्या दिवशी बहाळ दरवाजाला नारळाचे तोरण बांधले जाते. बैलांसोबत वेगाने धावत येऊन उंचावरवरील तोरणाचे नारळ मिळवायचे. नारळ मिळविणारा अर्थातच मानकरी ठरतो आणि पोळाही फुटतो.
पशुपालन मोठय़ा प्रमाणावर
चाळीसगाव शहरात गो-पालन (म्हशीदेखील) पालन करणारा गवळी समाज मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहे. काही भागात ते एकसंख्येने राहतात. शहरात तीन ते चार मोठे गवाळीवाडेही आहेत. ग्रामीण भागात शेतीला पूरक म्हणून पशुपालन केले जाते. त्यामुळे बैलाला बालपणापासून काळजीपूर्वक वाढविण्यात येते. खुराकही दिला जातो. जीवाचे मैतर असणा:या सर्जा-राजाला मोठय़ा मायेने वाढविले जाते. त्यामुळेच पोळा हा सण येथील शेतक:यांसह गवळी समाजास आनंदासह परंपरा जपण्यास बळ देतो.
नारळाचे तोरण
जुन्या न.पा. इमारतीखाली पूर्वी गावात जाण्यासाठी दरवाजा केला आहे. यालाच बहाळ दरवाजाही संबोधले जाते. येथे या दरवाजाला मानाच्या नारळाचे तोरण बांधले जाते. पोळ्याच्या दिवशी सायंकाळी नारळ मिळवण्याचा उत्सव रंगतो. शहरासह आजूबाजूच्या खेडय़ातील शेतकरी आपापले सर्जा-राजा सजवून येथे घेऊन येतात. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत एकेक करून तोरणाचे नारळ तोडण्याची जणू स्पर्धाच रंगते.
नारळाचा मानकरी
एका हाताने बैलाचा दोर घट्ट पकडून वेगाने पळत येऊन दुस:या हाताने उंच उडी मारत नारळ मिळविणारा पोळ्याचा मानकरी ठरतो. सर्जा-राजा, ढवळ्या-पवळ्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या निनादासह जल्लोषात पोळा फुटतो. सायंकाळी पोळा फुटण्याचा उत्सव पाहण्यासाठी गर्दी उसळते.
हौस म्हणून बैलांचे पालनपोषण
शहराच्या लगत काही व्यवसायिक, उद्योगपती, राजकीय व्यक्ती, डॉक्टर्स यांची फार्महाऊस स्वरुपातील शेती आहे. हौस म्हणून तेही बैलांचे पालनपोषण करतात. पोळा उत्सवात त्यांचेही बैल सहभागी होतात. गेल्या काही वर्षात यामुळे बैलांची संख्या वाढली आहे. पोळ्या पूर्वी बैल विकत घेऊन त्याची ऊसतोडी हंगामासाठी पूजा करण्याची प्रथा येथील बंजारा बांधवांमध्ये आहे. त्यामुळे गुरांच्या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते.
कल्ला आणि टाळ्या
बरसणा:या श्रावणसरी, पावसाची रिपरिप, चिखल अशा आनंद झडीत पोळा फोडण्याचा उत्सव रंगतो. यंदा पावसाने पंधरा दिवसांचा ‘ब्रेक’ घेत पोळ्यापूर्वी दणक्यात ‘कमबॅक’ केल्याने पोळ्याचा जोश वाढला असून पोळा फोडण्याचा उत्सवही जल्लोषात साजरा होणार आहे. एकमेकांना ‘टशन’ देत फुरफुरणा:या सर्जा-राजांच्या सहभागाने सालाबादाप्रमाणे यंदाही पोळ्याचा उत्सव संस्मरणीय ठरणार आहे.