तीन दिवसांत २५७८ जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:31+5:302021-05-20T04:17:31+5:30
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका ...
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. सोमवार ते बुधवार अवघ्या तीन दिवसांत जिल्ह्यात विनाकारण फिरणे, मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या २५७८ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिली.
मास्क न वापरणाऱ्या २०३१ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ५ लाख २७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ४५३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख २३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कलम १८८ अन्वये गुन्हे ९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. १८ मेपर्यंत ९ हजार ५०१ रुग्ण कोरोना बाधित होते. दर दिवसाला ५०० च्या वर रुग्ण वाढत आहेत, तर मृतांची संख्यादेखील १० ते १५ च्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांत बेड व व्हेंटिलेटर मिळेनासे झाले आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नागरिकांनी आता स्वतः पुढाकार घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
अशी आहे कारवाई
१) विना मास्क : २०३२
दंड : ५,२७,३००
२) सोशल डिस्टन्सिंग : ४५३
दंड : १,२३,४००
३) कलम १८८ : ९६
दंड : ४८,०००
एकूण दंड : ६,९८,७००
कोट...
जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. जनतेने कोरोनाचे गांभीर्य ओळखून आता तरी सावधानता बाळगावी. पोलिसांची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. पुन्हा लाॅकडाऊनची ती वेळ येऊ न देणे जनतेच्याच हातात आहे. त्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करून आरोग्य व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक