फौजदारासह पोलिसाच्या कानशिलात लगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:48 PM2019-02-15T12:48:13+5:302019-02-15T12:49:37+5:30
आॅल आऊट मोहीमेत वाद
जळगाव : पोलीस अधीक्षकांच्या आॅल आऊट मोहिमेत बुधवारी रात्री वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन थेट वाहतूक पोलीस व फौजदाराच्या कानशिलात लगावल्यापर्यंत झाले. शनी पेठ पोलीस ठाण्यातच दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी प्रदीप दिलीप चौधरी (वय ३४, रा.सुरत) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशाने बुधवारी रात्री १० ते गुरुवारी पहाटे पाच या कालावधीत जिल्ह्यात आॅल आऊट मोहीम राबविण्यात आली. जळगाव शहरात शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनाही या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यानुसार वाहतूक शाखेचे सचिन एकनाथ गायकवाड महेंद्र युवराज पाटील व मंगेश रवींद्र पाटील असे तिघं कर्मचारी नेरी नाका चौकात रात्री ११ वाजता वाहनांची तपासणी करीत असताना प्रदीप दिलीप चौधरी हा दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.एल.१८८०) येत असताना त्याला अडविले. वाहन परवाना व कागदपत्रांची मागणी केल्यावरुन चौधरी व पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, तुषार शरद कोल्हे व इतर पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अधिकच चिघळ्याने चौधरी याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवून शनी पेठ पोलीस ठाण्यात आणले.
शनी पेठ पोलीस ठाण्यात बुक्क्यांनी मारहाण
शनी पेठ पोलीस स्टेशनला आल्यावर चौधरी व सचिन गायकवाड यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी चौधरी याने गायकवाड याच्या पोटात व छातीवर बुक्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर मध्यस्थी करायला आलेले उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांच्याही कानशिलात लगावत त्यांच्या तोंडावर बुक्क्याने मारहाण करायला सुरुवात केली. यात गायकवाड यांना तर कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी शनी पेठ पोलीस गाठले. प्रदीप चौधरीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहेत.