जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल

By सागर दुबे | Published: April 19, 2023 05:02 PM2023-04-19T17:02:31+5:302023-04-19T17:03:12+5:30

रामानंदनगर पोलिसांनी 'झारखंड'ची आणची एक थैली गँग पकडली

police arrested jharkhand mobile thief gang jalgaon crime news | जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल

जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल

googlenewsNext

जळगाव : जळगावसह अकोला, नाशिक, खामगाव, भुसावळ येथील भाजी बाजारांमध्ये फिरून ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबविणार्‍या झारखंडच्या 'थैली गँग'चा दहा दिवसांपूर्वी रामानंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यात पोलिसांनी १५ मोबाईल हस्तगत केले होते. आता पुन्हा रामानंदनगर पोलिसांनी आणखी एका 'थैली गँग'ला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून चोरीचे २७ मोबाईल ताब्यात घेतले असून आणखी काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही गँग मोबाईल लांबविल्यानंतर झारखंड येथे विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.

इंद्रनिल सोसायटी येथील नितीन सोनवणे हे १३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह परिसरातील भाजी बाजारात खरेदीसाठी आले होते. भाजी खरेदी करताना त्यांच्याजवळील मोबाईल दोन जणांनी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. झटापट होवून सोनवणे यांनी एका अल्पवयीन मुलाला पकडून थेट रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. रामानंदनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्या दुस-या साथीदाराचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला. हळूहळू त्याची माहिती मिळाल्यानंतर तो भुसावळात असल्याची माहिती मिळाली आणि रात्रीच पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलालासोबत घेवून भुसावळ गाठले.

बॅगमध्ये तब्बल २७ मोबाईल
रात्री भुसावळातील बसस्थानक परिसरात पोलिस अल्पवयीन चोरट्याच्या साथीदाराचा शोध सुरू असताना, अल्पवयीन मुलाने लागलीच पोलिसांना सांगितले की, 'साहेब तो बघा काळ्या बॅगवाला उभा आहे तोच आहे तो' आणि पोलिसांनी सापळा रचून त्याच्या साथीदाराला पकडले. दरम्यान, त्याच ठिकाणी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये तब्बल २७ मोबाईल पोलिसांना मिळून आले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले तर त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. तर दोघेही झारखंड येथील असल्याची माहिती तपासात समोर आली. तर ही गँग लहान मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवित असल्याची माहिती समोर आली.

आतापर्यंत ४ जणांना अटक, ६ ताब्यात...
दोन आठवड्यापूर्वी दादावाडी येथील लखीचंद वामन बडगुजर हे मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केटमध्ये जात होते. त्यावेळी चार युवकांनी त्यांच्याजवळील मोबाईल लांबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील तीन जणांना लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. रामानंदनगर पोलिसांनी चौथ्याचा शोध घेवून त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल १५ मोबाईल ताब्यात घेतले होते. तर ही सुद्धा थैली गँग असल्याचे समोर आले होते. आतापर्यंत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण ४ जणांना अटक झाली असून सद्या ते कारागृहात आहेत. तर ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकूण ४२ मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, सपोनि. रोहिदास गभाले, पोउपनि. गोपाल देशमुख, रेवानंद साळूंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, संजय सपकाळे, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दीपक वंजारी, संतोष पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

Web Title: police arrested jharkhand mobile thief gang jalgaon crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.