वाळू वाहतूकदारांच्या खब-यांवर करणार गुन्हे दाखल, जळगावात तीन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:45 PM2017-11-17T12:45:06+5:302017-11-17T12:46:03+5:30
महसूल कर्मचा-यांची सुरक्षा व वाहतुकीला अटकावसाठी हत्यार
जळगाव : विविध उपाय करूनही वाळू वाहतूक सुरूच असल्याने त्याला आळा घालण्यासाठी वाहतूकदारांच्या खब:यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे असल्याच्या दृष्टीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली महसूल विभागात सुरू आहे. दरम्यान, बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी एकूण वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले असून त्यांच्याकडून प्रत्येकी 17 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
वाळू वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई सुरूच आहे. असे असले तरी वाळू वाहतूक काही थांबत नसल्याचे चित्र आहे. वाळू वाहतूक सुरू असताना वाहतूकदारांचे सहकारी जागोजागी थांबून कोण येते, कोणते पथक कोठे जाते याकडे लक्ष ठेवतात व याबाबत वाळू वाहतूकदारांना सतर्क करीत असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहे.
या मंडळींनी संबंधितांना माहिती दिल्याने अवैध वाळू वाहतुकीस मदत होते. प्रसंगी महसूल कर्मचा:यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून वाळू वाहतूकदारांपाठोपाठ आता त्यांच्या मागे-पुढे असणा:या खब:यांवरही गुन्हे दाखल करण्यात येण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
51 हजाराचा दंड वसूल
गुरुवारी सकाळी शिरसोली येथे तर बुधवारी रात्री आकाशवाणी चौक तसेच शिवाजीनगरात वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळून आल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी कारवाई करीत हे ट्रॅक्टर तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. प्रत्येकी एका ट्रॅक्टरला 17 हजार असा एकूण 51 हजाराचा दंड करण्यात येऊन प्रांताधिका-यांकडे बंधपत्र करण्याबाबत सूचित करण्यात आले.