दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून पोलिसाची पकडली कॉलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:48+5:302021-07-16T04:12:48+5:30
जळगाव : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून सागर महारु सपकाळे उर्फ सागर पट्टी (रा.प् रजापत नगर) याने शहर ...
जळगाव : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून सागर महारु सपकाळे उर्फ सागर पट्टी (रा.प् रजापत नगर) याने शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार केले व त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता हा दुसरा गुन्हा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा मद्याच्या आहारी गेला आहे. दारू पिण्यासाठी सतत पोलिसांकडे पैशाची मागणी करीत असतो. बुधवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात येऊन त्याने मद्याच्या नशेतच पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. मद्यपी म्हणून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याच्या या ओरडण्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. त्याला बाहेर काढत असताना हवालदार रवींद्र पाटील यांच्याकडे त्याने शंभर रुपये मागितले. नाही दिले तर अंगावर ब्लेडने वार करून येथेच आत्महत्या करतो, असा दम भरला. पाटील यांनी पैसे न दिल्याने त्याने स्वत:च्या हाताने अंगावर, हातावर, पायावर व गळ्यावर ब्लेडने वार केले. हे वार तुम्हीच केले असे वरिष्ठांना सांगतो असा दम भरला. त्याला आवरायला गेलेल्या पाटील यांची कॉलर पकडून त्याने पुन्हा शिवीगाळ केली. पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले. रात्री हवालदार रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केला व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नांदुरकर करीत आहेत.