पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’, दोघे ‘तडीपार’ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:11 AM2021-05-08T00:11:10+5:302021-05-08T00:13:12+5:30
गुन्हेगार प्रवृत्तीचा समूळ नायनाट व्हावा, याकरिता आठवड्यातून एक दिवस ‘कोम्बिंग डे’ राहणार आहे.
भुसावळ : शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगार प्रवृत्तीचा समूळ नायनाट व्हावा, याकरिता आठवड्यातून एक दिवस ‘कोम्बिंग डे’ राहणार असून, यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीसीटर पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. ६ मे रोजी रात्री बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन हद्दपार आरोपींना अटक करण्यात आली. हेमंत उर्फ (सोन्या) जगदीश पैठणकर आणि चेतन उर्फ (गुल्या) पोपट खडसे अशी आरोपींची नाव असून, पाच गुन्हेगारांना समन्स बजावण्यात आले आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारी वृत्तीचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रात्री दुकानफोडी होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनातर्फे ‘व्यापारी पोलीस मित्र’ या संकल्पनेतून पोलिसांसोबत व्यापारीवर्ग बाजारपेठ हद्दीत गस्त घालत आहे. याशिवाय आपापल्या परिसरामध्ये पोलीस प्रशासनासह जागरुक नागरिक चोरी, घरफोडी होऊ नये, याकरिता रात्री गस्त घालताना दिसून येत आहेत.
शहर व तालुक्यातील गुन्हेगारीचा संपूर्ण नायनाट व्हावा, याकरिता पोलीस प्रशासन आठवड्यातून एक दिवस ‘कोम्बिंग डे’ राबवणार आहे. यात हद्दपार आरोपी, हिस्ट्रीसीटर, गुन्हेगारी वृत्ती, नशेच्या आहारी गेलेली तरुण मुलं यांची चौकशी केली जाणार आहे. याचाच भाग म्हणून शहरात शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यात हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
हद्दपार आरोपी जाळ्यात
‘कोम्बिंग ऑपरेशन डे’ला पेट्रोलिंग करत असताना हद्दपार आरोपी हेमंत उर्फ (सोन्या) जगदीश पैठणकर (२७, रा. भिरूड हॉस्पिटलजवळ) व चेतन उर्फ (गुल्या) पोपट खडसे (२८, रा. हनुमान नगर, भुसावळ) हे दोन्ही आरोपी एक वर्षाकरिता हद्दपार आहेत. मात्र, असे असतानाही ते हद्दपारीचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या शहरात वावरताना आढळले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई
वाल्मीक नगरातील रामदेवबाबा मंदिराजवळ संशयित आरोपी भीमराव जानू इंगळे (७५) हा १५ लीटर गावठी हातभट्टीची दारू २० लीटरच्या कॅनमधून विक्री करत होता. त्याच्याजवळील गावठी दारू ताब्यात घेण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नॉन बेलेबल आरोपी ताब्यात
बाजारपेठ हद्दीतील नॉन बेलेबल आरोपी शेख मुजम्मिल शेख शब्बीर (३०, रा. ग्रीन पार्क, भुसावळ) हा शहरात फिरत असताना त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पाच समन्सची बजावणी
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाच गुन्हेगारांना समन्सची बजावणी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. यापुढे गुन्हेगारीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोम्बिंग डे राबविणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, हेडकाॅन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, कृष्णा देशमुख, नेव्हिल बाटली, रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरडकर, चंद्रकांत बोदडे, समाधान पाटील, महेश चौधरी, यासीन पिंजारी, योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बिऱ्हाडे, कर्तारसिंग परदेशी, सचिन चौधरी यांनी ही कारवाई केली.