ट्रीगर दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटून चोपड्यातील पोलीस गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:32 PM2018-02-03T19:32:48+5:302018-02-03T19:37:52+5:30
रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसाने खांद्याला लावलेल्या बंदुकीचा पट्टा घट्ट करतांना ट्रीगर दाबला जाऊन गोळी सुटल्याने हा पोलीस गंभीर जखमी झाला.
आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.३ : येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उमेश बळीराम धनगर ( वय ३८) हे रात्रीच्या ड्युटीदरम्यान स्वत:जवळील बंदुकीची सिलिंग टाईट करीत असताना अंधारात ट्रीगर दाबला गेल्याने गोळी सुटून गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. जखमी पोलिसावर जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रानुसार, उमेश धनगर हे २ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता एसएलआर बंदूक घेऊन सातपुड्यातील तेल्याघाट येथे रात्रीच्या गस्तीसाठी गेले होते. दरम्यान १०: ३० वाजेच्या सुमारास चोपडा ते बोरअजंटी दरम्यान त्यांनी खांद्याला लावलेल्या बंदुकीची सिलिंग (पट्टा) बंदुक जमीनीवर उभी ठेऊन घट्ट करीत असताना अंधारात ट्रीगर दाबला गेला. त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटून ती उमेश धनगर यांच्या डाव्या खांद्याखाली लागून आरपार निघाली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेतही त्यांनी मोबाईलवरून पोलीस स्टेशनला ही घटना कळवली. त्यामुळे त्यांना तात्काळ चोपडा येथे आणण्यात येऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले.
सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ माजली असून घटनास्थळी चोपडा शहर पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, राजेंद्र महाजन, प्रवीण मांडुळे, संदीप धनगर व संदीप पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी सदर बंदूक व ९ जीवंत काडतुसे व एक फायर झालेल्या गोळीची पुंगळी असा मुद्देमाल जप्त केला आहे.