पोलीस कंट्रोल रूम बनलाय वॉररुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:51 PM2020-05-19T12:51:58+5:302020-05-19T12:52:03+5:30
५४ दिवसात ९४५ कॉल : मुंबईच्या कॉलने ग्रामीण भागात महिलेला मिळाली मदत
जळगाव : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाकडून सर्वोतपरी उपाययोजना सुरु आहेत. या काळात यंत्रणेत समन्वय राखण्याची तसेच नागरिकांना मदत मिळविण्याची महत्त्वाची भूमिका पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाकडून निभावली जात आहे. सध्या नियंत्रण कक्ष हा कोरोना विरोधातील लढाईत वॉररुमची भूमिका निभावत आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हा लॉकडाऊन वाढविण्यात आला.
२४ मार्चपासून आजपर्यंत ५४ दिवसात नियंत्रण कक्षात ९४५ नागरिकांनी कोरोनाबाबत मदतीसाठी फोन केले आहेत. त्यातील सर्वाधिक कॉल हे १०० क्रमांकावर तर उर्वरित कॉल नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर आलेले आहेत. संबंधित व्यक्तीची समस्या लक्षात घेऊन नियंत्रण कक्षाकडून हा निरोप तत्काळ संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचविला जात आहेत.
या समस्येवर फोन...
लॉकडाऊनच्या काळात नियंत्रण कक्षात वैद्यकीय उपचार, मास्क न लावता मॉर्निंग वॉक, रात्री जेवणानंतर फिरायला जाणारे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, स्थलांतरीत नागरिक, अवैध व्यवसाय, गर्दी जमली, गावात बाहेरून नागरिक आलेत, अमूक व्यक्तीने आरोग्य तपासणी केलीच नाही आदी समस्यांसंदर्भात सर्वाधिक फोन आले.
१०० या क्रमांकावर फोन केला की, पोलिसांशी संपर्क होतो हे सर्वसामान्य माणसांनाही माहित आहे. त्यामुळे विविध समस्यांसाठी नागरिक नियंत्रण कक्षात फोन करून मदत मागत आहेत. या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना पोलिसांच्यावतीन मदत केली जात आहे.
भाचीच्या कॉलने मामीला मदत
गेल्या आठवड्यात नवी मुंबई येथून एका महिलेचा नियंत्रण कक्षात एक कॉल आला. भातखेडे, ता.एरंडोल येथे मामीची प्रकृती बिघडली असून छातीत वेदना व श्वास घ्यायला त्रास होत असून लॉकडाऊन व पैशाअभावी डॉक्टरकडे जात येत नाही. गावातून सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जाण्यास कोणीही तयार होत नाही. रुग्णवाहिका किंवा वाहन उपलब्ध करुन दिले तर बरं होईल, मी आॅनलाईन पैसे पाठविते अशी विनंती या महिलेने केली. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी ही माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) डी.एम.पाटील यांना दिली. पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करुन कासोदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तेथील ठाणे अमलदाराला तातडीने महिलेच्या घरी रवाना केले. पोलीस पाटील व ठाणे अमलदारांनी महिलेचे घर गाठले असता या महिलेचा उच्च रक्तदाब होता व त्याची औषधी संपल्याचे उघड झाले. त्यांनी या महिलेला औषधी उपलब्ध करुन दिली, त्यामुळे महिलेने जळगाव येथे येण्यास नकार दिला. मदत मिळाल्यामुळे महिलेचा जीव भांड्यात पडला. या मदतीनंतर परत नियंत्रण कक्ष व डी.एम.पाटील यांना माहिती कळविण्यात आली.
रोज ७० ते ८० जणांकडून मदतीसाठी याचना
लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे अनेक जण कल्याण, मुंबई, पुणे, सुरत यासारख्या वेगवेगळ्या शहरात अडकून पडले होते. त्यांना परत जिल्ह्यात कसे येता येईल यासंदर्भात विचारणा करण्यासाठी नागरिक कॉल करत होते. तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी व परराज्यात अडकलेल्या नातेवाईकांना जिल्ह्यात येण्यासंदर्भात माहिती घेण्यासाठीही नागरिक फोन करत होते. कॉल करणाºया प्रत्येक नागरिकांना नियंत्रण कक्षातून त्यांच्या समस्या आणि त्यावर प्रशासकीय प्रक्रिया अथवा कोणाशी संपर्क करावा याबाबत माहिती दिली जात आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात दररोज ७० ते ८० कॉल नियंत्रण कक्षात येत होते आताही तोच आकडा कायम असल्याची माहिती नियंत्रण कक्षाचे निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून रोज ७० ते ८० नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी संपर्क करीत आहेत. आतापर्यंत ९४५ कॉल केवळ कोरोनाबाबतच आहेत. त्यात १०० या क्रमांकावर सर्वाधिक कॉल आलेले आहेत. या नागरिकांना नियंत्रण कक्षातून योग्य ती माहिती दिली जाते तसेच काही घटना घडली असेल तर संबंधित यंत्रणेला तत्काळ निरोप सांगून घटनास्थळी पाठविले जाते. सध्या अडचणीच्या काळात सर्व यंत्रणेशी समन्वय राखण्याचे काम नियंत्रण कक्षाकडून सुरू आहे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, जळगाव.