चोपडा शहरात गुटखा विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:24 PM2021-05-18T21:24:50+5:302021-05-18T21:27:14+5:30
पोलिसांनी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा पकडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : शहरात पोलिसांनी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा व चार लाखांचे पिकअप वाहन असा मिळून साडेआठ लाखांचा ऐवज जप्त केला. गुटख्यासंदर्भात शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करीत तिघा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली १७ व १८ रोजी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे पथक रात्री गस्त करीत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, शहरातील पाटीलगढी भागात छापा टाकला. त्यावेळी रमाकांत बाबुराव मराठे यांच्या कब्जात एक्यान्नव हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपी राहुल विश्वास गुजराथी (गुजराथी गल्ली, चोपडा) यास ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपींवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
अटकेदरम्यान मुख्य आरोपी राहुल गुजराथी याने दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप वाहन (एमएच १९/५३८७) ताब्यात घेण्यात आली असता त्यात तब्बल २१ प्रकारचा पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण ३ लाख ५८ हजार १५० रुपये किमतीच्या माल व ४ लाख रुपये किमतीची पिकअप वाहन व चालक श्याम बडगुजर मिळून आला. आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने हा माल राहुल गुजराथी याचा असल्याबाबत सांगितले.
चार लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये किमतीचा गुटखा व चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप असे एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल व तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, अंबादास सैंदाणे, विलेश सोनवणे, संतोष पारधी, प्रदीप राजपूत, ज्ञानेश्वर जवागे, शेषराव तोरे, वेलचंद पवार, रत्नमाला शिरसाट, संदीप भोई, रवींद्र पाटील यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस नाइक शेषराव तोरे करीत आहेत.