अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही पोलिसांची दंडुकेशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:38+5:302021-05-22T04:15:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या तीन दिवसापासून अनावश्यकरित्या फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला जात आहे. पोलिसांच्या कडक ...

Police crackdown on people in essential services | अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही पोलिसांची दंडुकेशाही

अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही पोलिसांची दंडुकेशाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या तीन दिवसापासून अनावश्यकरित्या फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला जात आहे. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे. शुक्रवारी मात्र, पोलिसांनी कहरच केला. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्यांवर दंडुका चालवून दंडात्मक कारवाई केली. बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांकडून अनावश्यकरित्या दादागिरी होत असल्याची ओरड होत आहे.

शुक्रवारी सकाळी सात वाजता महाबळ, गाडगेबाबा चौक व रायसोनी नगर या परिसरात पोलीस दलाची मोठी व्हॅन भरुन पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले. दिसेल त्याच्यावर दंडुका चालविला इतकेच काय अत्यावश्यक सेवा म्हणून प्रशासनाने ज्यांना परवानगी दिलेली आहे ते दूध विक्रेते व पेपर विक्रेत्यावरही या पोलिसांनी दंडुके चालवले. इतकेच काय तर महापालिकेच्या वतीने प्रत्येकी दोनशे रुपये दंडही आकारला. दंडात्मक कारवाई करताना मनपाचा एकही कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हता. मात्र मनपाचे पावती पुस्तक या पोलिसांकडे होते. गाडगेबाबा चौकात विशाल किशोर वाणी या पेपर विक्रेत्याला मारहाण केली तसेच दूध विक्रीचे दुकान बंद करायला लावले. रायसोनी नगरातही सुनील पाटील या पेपर विक्रेत्याला मारहाण केली. गुन्हेगार लोकांपेक्षा पोलिसांची या भागात लोकांना भीती वाटायला लागली आहे.

पोलिसांच्या दादागिरीचा निषेध

मास्क लावला नाही म्हणून मध्यप्रदेशात एका महिलेला पोलिसांनी डोक्याचे केस धरून ओढत मारहाण केली, याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला जात आहे, याची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी या पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले. तसाच काहीसा प्रकार जळगावात घडलेला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो व कडक संचारबंदी लागू होते,त्यावेळी पोलिसांकडून रस्त्यावर दिसेल त्याच्यावर दंडुका चालवला जातो, मात्र आता तशी परिस्थिती नसतानाही पोलिसांकडून दंडुके चालवले जात आहेत, काही मोजक्या पोलिसांच्या या कृतीमुळे पोलीस दलाची बदनामी होऊ लागली आहे. गेले तीन दिवस पोलिसांनी सकाळी उठून अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली,त्याचा परिणाम म्हणून गर्दी कमी झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात घटली. एकीकडे कोरोना योद्धा म्हणून पोलीस रस्त्यावर फिरत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असताना दुसरीकडे अशा कृतीमुळे पोलीस दल बदनाम होऊ लागले आहे. या कृतीमुळे पोलिसांच्या चांगल्या कामांवरही पाणी फेरले जात आहे.

Web Title: Police crackdown on people in essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.