पोलिसांना ‘नवचैतन्य कोर्स’ची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:35 AM2018-12-01T11:35:13+5:302018-12-01T11:40:33+5:30
पोलीस दलात विशेष दबदबा असलेल्या ८० पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी एक महिन्याच्या ‘नवचैतन्य कोर्स’ ला मुख्यालयात जमा केले आहे. पहाटे पाच ते सायंकाळी साडे सात असा नित्याचा हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या सर्व कर्मचाºयांनी दिवसातून तीन वेळा बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी सुरु केल्याने या कर्मचा-यांची फार मोठी गोची झालेली आहे.
सुनील पाटील
जळगाव : पोलीस दलात विशेष दबदबा असलेल्या ८० पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी एक महिन्याच्या ‘नवचैतन्य कोर्स’ ला मुख्यालयात जमा केले आहे. पहाटे पाच ते सायंकाळी साडे सात असा नित्याचा हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या सर्व कर्मचा-यांनी दिवसातून तीन वेळा बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी सुरु केल्याने या कर्मचा-यांची फार मोठी गोची झालेली आहे. प्रत्येक पोलिसांसाठी वर्षातून एक वेळा पंधरा दिवसाचा चैतन्य कोर्स तसा आवश्यकच आहे. मात्र या पोलिसांना त्याव्यतिरिक्त हा अतिरिक्त व त्यातही एक महिन्याचा कालावधी आहे. पंधरा दिवसाच्या कोर्सला असणारे बहुतांश पोलीस हजेरी मास्तरशी सेटींग करुन कोर्सला फक्त कागदोपत्री हजर रहायचे. यावेळी मात्र राखीव निरीक्षकांनाच तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिसाला हजर रहावेच लागत आहे. प्रभारी अधिका-यांच्या मर्जीतले समजले जाणारे हे पोलीस पोलीस स्टेशनला कोणतेच काम करीत नव्हते. त्यांच्या कामाची जबाबदारी दुसºया कर्मचा-यावर ढकलली जायची.ही बाबही पोलीस अधीक्षकांनी हेरली आहे. एक महिन्याचा कोर्स झाल्यानंतर पुढे भविष्य काय असेल याचीच चिंता आता हे पोलीस करीत आहेत. पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती होते कि उचलबांगडी होते हे कोणालाच माहित नाही, परंतु त्या विचारांचे भूत कर्मचा-यांना मनात कायम आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष दर्जा असलेल्या पोलिसांना तसेच काही अधिका-यांना वठणीवर आणल्याने पोलीस दलातील ९० टक्के कर्मचारी सुखावले आहेत. तर अवैध धंद्यांशी संबंधित कर्मचारी धास्तावले आहेत.अवैध धंदे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनतेतही समाधान व्यक्त होत आहे. आता अपेक्षा इतकीच आहे की, पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यापर्यंत आलेल्या नागरिकांना वेळ व न्याय द्यावा ही अपेक्षा आहे.