दारूबंदीबद्दल महिलांतर्फे पोलिसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 07:17 PM2018-09-09T19:17:16+5:302018-09-09T19:17:37+5:30
उत्कृष्ट कार्याबद्दल मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नावे यांचा सत्कार
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पोलिसांबद्दल कायम नकाराची भावना व नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठीदेखील पोलीस हे किती महत्त्वपूर्ण ठरू शकतात याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. तसेच शहाण्याने पोलिसांची पायरी चढू नये असे म्हणतात, मात्र शहाण्याने मोठेपणा दाखवत पोलिसांच्या कार्याचा गौरव करणे हेदेखील तेवढेच आवश्यक असल्याचे वरणगाव व सावदा येथील महिलांनी दाखवून दिले आहे.
मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे यांच्या पथकाने गेल्या काही दिवसात वरणगाव नगरपालिका हद्द तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत आणि सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध ठिकाणी अवैध गावठी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात गावठी दारूचे अड्डे नष्ट केले आहेत. गावठी दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने महिलांना या व्यवसायाचा फार मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र पोलिसांची असलेली मिलीभगत यामुळे दारू दुकानदार यांचे फावत होते. मात्र मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे यांनी त्याला अपवाद दाखवत गेल्या काही दिवसांमध्ये वरणगाव व सावदा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाया केल्या. या कार्यामुळे आपले संसार उद्ध्वस्त होण्यापासून नक्कीच वाचतील म्हणून काही महिलांनी मुक्ताईनगर येथे पोलिस उपविभागीय कार्यालयात येऊन सुभाष नेवे व पोलीस कर्मचारी अक्षय हिरोळे यांचा सत्कार केला. एवढेच नव्हे तर इतर पोलीस पथकातील सर्व कर्मचाºयांच देखील त्यांनी याप्रसंगी गौरव केला.
महिला पोलीस पंचायत, सिध्देश्वरनगर वरणगाव व वाघोदा बुद्रूक, ता.भुसावळ येथील महिला रागिणींमार्फत मुक्ताईनगर येथे करण्यात आला. याप्रसंगी सविता माळी (विभाग सचिव, ओबीसी फाऊंडेशन इंडिया कृत माळी सेवा महासंघ, माहिला आघाडी, खान्देश) व महिला पोलीस पंचायत, सिध्देश्वरनगर वरणगाव व सोनाली महाजन व इतर महिला वाघोदा बुद्रूक, ता.भुसावळ तसेच इतर महिलादेखील उपस्थित होत्या.