गुन्ह्यात मुलांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:14 PM2019-11-20T22:14:13+5:302019-11-20T22:14:23+5:30
बालक सुरक्षितता सप्ताह : भीक मागण्यासाठी लहान बालकांच्या अपहरणाच्या संख्येत दिवसागिणक होतेय वाढ
जळगाव : गुन्हेगारी टोळ्या आपले ध्येय, उद्दीष्ट व हेतू साध्य करण्यासाठी बालकांचा वापर करीत आहेत, त्यामुळे पालक, शिक्षक यांनीच आपला पाल्य शाळा, महाविद्यालय व क्लासला जातोय का? त्याचे मित्र कोण याची माहिती ठेवून सतत बालकांच्या संपर्कात राहून अशा टोळक्यांपासून त्यांचा बचाव करावा व बालकांनीदेखील अशा व्यक्तींपासून लांब रहावे असे आवाहन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा विभागाच्या (एएचटीयु) प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी केले.
संयुक्त राष्टÑ संघाचे ‘बालकांचे हक्क’ यावर झालेल्या अधिवेशनास २० नोव्हेंबर रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून पोलीस दलातर्फे बालदिनापासून ‘सर्वत्र बालकांची सुरक्षितता’ या संदर्भात जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा विभागाच्या (एएचटीयु) प्रमुख नीता कायटे यांनी डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थिनींना कायदा व बालकांची सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन केले.
१०९८ टोल फ्री हेल्पलाईन
बालकांसाठी शासनाकडून १०९८ ही फ्री हेल्पलाईन सुविधा राखीव ठेवण्यात आली आहे. पोलीस हेल्पलाईन १०३ तर महिला व मुलींसाठी १०९१ ही हेल्पलाईन आहे. या सर्व हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन नीता कायटे यांनी केले आहे. बालविवाह तसेच ‘पोस्को’बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
बालकांच्या मदतीसाठी ‘जापू’ विभाग कार्यान्वित
राज्यात १४ वर्षाखालील हरविलेल्या मुलांच्याबाबतीत थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीत मुलांचा शोध लागला नाही तर हा गुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा विभागाकडे (एएचटीयु) वर्ग होतो. कायद्यानुसार कलम ६३ अन्वये राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय राज्य बाल सहाय्य पोलीस केंद्र (जापू) विभाग प्रत्येक पोलीस घटकांमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान, अनेक प्रकरणात भीक मागण्यासाठी देखील बालकांचे अपहरण केले जात असल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे अनोळखी व्यक्तीपासून सावध रहाण्याची सूचना करण्यात येत आहे.