पुण्याच्या सराफा दरोड्यात जळगावच्या बडतर्फ पोलिसाचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:39 PM2019-12-03T12:39:24+5:302019-12-03T12:40:08+5:30
तपास पथक शहरात दाखल
जळगाव : पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्स या दुकानात पिस्तुलधारी दोघांनी टाकलेल्या दरोड्यात जळगाव पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसाचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे एक पथक सोमवारी जळगावात दाखल झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथे २४ नोव्हेंबर २०१९ रोजी भरदिवसा दुपारी साडे चार वाजता पेठे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात दोघांनी प्रवेश करुन गावठी पिस्तुल मंगेश वेदक यांच्या दिशेन रोखला. त्यानंतर ‘गप बसायचं, आवाज नाय पाहिजे, हात वर करायचे आणि सोन्याचा सगळा माल काढून खाली ठेवायचा आवाज केला तर गोळी घालेन’ अशी धमकी देत दुकानातून १० लाख १९ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याप्रकरणी मंगेश मनोहर वेदक (रा. काळभोरनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी तपास करीत आहेत.
सीसीटीव्हीत दोन्ही संशयित कैद
या सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. हे फुटेज राज्यभर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन त्यातील एक जण जळगावचा बडतर्फ पोलीस असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. दुकानातून निघाल्यानंतर दोघं संशयित गळ्यात बॅग अडकवून रस्त्याने काही अंतर चालत गेले आहेत. जळगाव पोलिसांकडे हे फुटेज प्राप्त झाले आहे. पुणे पोलिसांचे एक पथक सोमवारीच दाखल झाले. त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेतली. दरम्यान, या बडतर्फ पोलिसासोबत आणखी एक जण असून तो कुठला व कोण आहे हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. तीन वर्षापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात या पोलिसाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या कर्मचाºयाला सेवेतून बडतर्फ केले होते. आता पुण्याच्या दरोड्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
जळगावातून चोरलेल्या दुचाकीचा वापर
या दरोड्यात दोघांनी ज्या दुचाकीचा वापर केला, ती दुचाकी जळगावातून चोरल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीमुळे दरोडेखोर जळगाव जिल्ह्यातील असावेत, असा संशय तेथील पोलिसांना आला. या दुचाकीची माहिती जळगाव पोलिसांकडून काढली जात आहे. दुचाकी नवीन असल्याने आरटीओकडे त्याची नोंदणी झालेली नाही, त्यामुळे सोमवारी काही पोलीस शोरुममध्ये चौकशीसाठी गेले होते. ही दुचाकी कोणाच्या नावावर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.