जळगावात पोलिसाने घरात घुसून काढली महिलेची छेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 02:54 PM2018-08-23T14:54:44+5:302018-08-23T14:56:26+5:30
घरात कोणी नसल्याची संधी साधत एका पोलिसाने शासकीय गणवेशात महिलेची छेड काढल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता हरिविठ्ठल नगरात घडली.
जळगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधत एका पोलिसाने शासकीय गणवेशात महिलेची छेड काढल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता हरिविठ्ठल नगरात घडली. हा पोलीस रामानंद नगर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. दरम्यान, या पोलिसाविरुध्द कारवाई करण्यासाठी महिला, तिचा पती व समाजबांधवांनी रात्री साडे आठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले होते.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला हा पोलीस कर्मचारी बुधवारी दुपारी महामार्गावरुन दुचाकीने जात असताना पीडित महिलेचे पती दादावाडीजवळ भेटले. त्यानंतर ते पाळधी येथे निघून गेले. ही संधी साधून या पोलिसाने थेट महिलेचे घर गाठले. किचनमध्ये जावून तुमचे घर छान आहे, असे म्हणत पीडित महिलेशी गप्पा मारायला सुरुवात केली.
त्यानंतर बेडरुमध्ये गेला. पीडितेने आदरतिथ्याने पाणी आणले असता या पोलिसाने तू खूप सुंदर आहेस, तू मला आवडते असे म्हणत तिच्याशी अश्लिल वर्तन केले. या प्रकारामुळे महिला संतापली. तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून या पोलिसाने तेथून पळ काढला.
या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात झाल्याने महिला व रहिवाशी संतप्त झाले होते. बुधवारचा बाजार असल्याने या पोलिसाची ड्युटी बाजारपट्टयात लावण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला व काही नागरिक पोलीस ठाण्यात आल्यानंतर तेथे या पोलिसाला पाचारण करण्यात आले होते.
तेथे या पोलिसाने झाल्या प्रकाराची कबुली देत माफी मागितली, मात्र पीडित महिला व अन्य नागरिक गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर ठाम होते.
सही घेण्याच्या बहाण्याने गेला
लहान मुलांच्या भांडणाºया कारणावरुन पीडित महिला व तिच्या पतीविरुध्द शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. याप्रकरणात सही घेण्याच्या बहाण्याने हा पोलीस पीडित महिलेच्या घरात गेला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने महिलेशी अश्लिल वर्तन केले.
अन् पोलीस ठाण्यात जमला जमाव
हा पोलीस गेल्यानंतर या महिलेने झाल्या प्रकाराची माहिती पतीला दिली. त्यांनी दुपारी चार वाजता घर गाठले. जळगाव विश्वकर्मा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम व महिला अध्यक्ष निता सांगोळे यांना त्यांनी ही माहिती दिली. या दोघा पती-पत्नीने दहा ते १५ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री साडे आठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. छेड काढणाºया पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्याशीही या पीडित महिलेने व जमावाने चर्चा केली. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.