लाॅकडाऊनमध्ये पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:27 PM2021-04-08T18:27:49+5:302021-04-08T18:29:28+5:30
भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले असून याअंतर्गत सहा तास शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी अभियान सुरु केले आहे. सहा तास शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात येऊन ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे नागरिकांच्या मालमत्तेच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनातर्फे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दि.७ रोजी रात्री ९ वाजेपासून पासून कोंबिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली व पहाटे ३ वाजता ही कारवाई थांबवण्यात आली. शहरामध्ये बाजारपेठ पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये संपूर्ण शहरामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, पकड वारंट मधील गुन्हेगार, स्टँडिंग वॉरंट त्याचप्रमाणे हिस्ट्री शीटर व अन्य विविध गुन्हेगार तपासणी करण्यात आली. त्यासाठी संपूर्ण शहरात एकंदरीत चार पथक तयार करण्यात आले होते. त्याशिवाय आरसीपी पथक देखील वापरण्यात आलेले होते.
कारवाईचा तपशील
या कारवाईत पाहीजे असलेल्या १९ आरोपींचा शोध घेतला असता, दोघांना अटक करण्यात आली. एकास स्टॅन्डींग वाॅरंट बजाविण्यात आला. ७ जणांना बेलेबल वाॅरंट बजावले, २ जणांना नाॅनबेलेबल वाॅरंट बजावले तर तडीपार असलेले ८ आरोपी तपासल्यानंतर त्यापैकी १ मिळून आला. १९ हिस्ट्रीशीटर्स तपासले असता, १३ घरी मिळाले. ३४ जणांना समन्स बाजविण्यात आले. तर २२ हजार ,४६४ रुपये किमतीचा ४३२ देशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.