रात्री ११ वाजता लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:15 AM2020-03-04T00:15:26+5:302020-03-04T00:15:30+5:30
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.
जळगाव : पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात गंभीर कलम लावण्यासाठी फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या संभाजी श्यामराव पाटील (रा. जे.डी.सी.सी.बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल भादंवि कलम ३०७च्या गुन्ह्यातील फिर्यादी असून त्यांना संभाजी पाटील यांनी मी तुमच्या गुन्ह्यात गंभीर स्वरूपाची कलमे लावलेली आहे. तसेच सदर केसमध्ये भक्कम पुरावा तयार करून केस मजबूत करतो, असे सांगून त्या मोबदल्यात तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यानंतर जळगावातील २० वर्षीय तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ३ मार्च रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन समोरच संभाजी पाटील यांना १० हजाराची लाच स्वीकारताना लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक रवींद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहिरे, सुनील पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, पो.कॉ. प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर यांनी केली. ज्या पोलीस ठाण्यात संभाजी पाटील कार्यरत आहेत, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.