‘ती’च्या साठी पोलीस कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा ड्रामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:26+5:302021-03-17T04:17:26+5:30

जळगाव : पतीसोबत संसारात रमलेल्या ‘ती’च्यावर पोलीस कर्मचाऱ्याचा जीव आला.. तिनेही प्रतिसाद दिला अन‌् त्यातून दोघांनी सोबत रेशीमगाठ बांधण्याचा ...

Police officer commits suicide for 'her'! | ‘ती’च्या साठी पोलीस कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा ड्रामा!

‘ती’च्या साठी पोलीस कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा ड्रामा!

Next

जळगाव : पतीसोबत संसारात रमलेल्या ‘ती’च्यावर पोलीस कर्मचाऱ्याचा जीव आला.. तिनेही प्रतिसाद दिला अन‌् त्यातून दोघांनी सोबत रेशीमगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी मात्र त्याला विरोध करताच पोलीस कर्मचाऱ्याने घरातच फास तयार करून आत्महत्या करीत असल्याचे फोटो काढले अन‌् ते कुटुंबीयांना पाठविले. पोलीस कर्मचारी आत्महत्या करीत असल्याचा फोन नियंत्रण कक्षात खणखणला अन‌् मग यंत्रणेची एकच तारांबळ उडाली... चित्रपटात शोभेल असा हा हायहोल्टेज ड्रामा मंगळवारी पोलीस लाईनमध्ये झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल असलेला तरुण पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला आहे. त्याचे एका विवाहित महिलेशी सूत जुळले. त्यातून दोघांनी रेशीमगाठ बांधून सोबत संसार फुलविण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वीच दोघे विवाह बंधनातही अडकले. मंगळवारी त्याने हा प्रकार पुण्यात राहणाऱ्या कुटुंबीयांना कळविला. त्यांनी या निर्णयास प्रखर विरोध केला. इकडे रेशीमगाठ बांधली गेली, तिकडे कुटुंबाचा विरोध होत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी या तरुणाने आत्महत्या करण्याचा ड्रामा केला. राहत्या घरात दोरीने फास तयार केला आणि त्याचे फोटो कुटुंबीयांना पाठविले. हा प्रकार घाबरलेल्या भावाने तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना फोन करुन सांगत त्याला वाचवा अशी विनंती केली.

पोलीस अधीक्षकांनी हलविली सूत्रे

अशा प्रकरणात जीव जाऊ शकतो याचा अंदाज घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तातडीने नियंत्रण कक्षाचे प्रमुख तथा पोलीस उपअधीक्षक डी. एम. पाटील (गृह) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांच्याशी संपर्क साधून तातडीने सूत्र हलवली. उपअधीक्षक पाटील यांनी स्वत:च संबंधित कर्मचाऱ्याचे घर गाठले, मात्र तेथे कोणीच नव्हते. तांत्रिक माहितीच्या आधारावर या कर्मचाऱ्याचे लोकेशन घेण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता मेहरुण तलावाजवळचे लोकेशन मिळाले. पाटील तेथे पोहचले, मात्र हा कर्मचारी तेथेही नव्हता तसेच त्याच्याशी संपर्क होत नसल्याने विवाह बंधनात आलेल्या महिलेचा शोध घेण्यात आला. तिच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क झाला, मात्र त्या घडीला हा तरुण पुण्याच्या दिशेने निघालेला होता. पहूरपासूनच त्याला परत मुख्यालयात बोलावण्यात आले. रात्री ८ वाजता अधिकाऱ्यांनी त्याला प्रेमाने समजूत घालून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

कोट...

संबंधित कर्मचाऱ्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. खासगी आयुष्यातील काही बाबी असू शकतील, मात्र भावाशी त्याचा काही तरी वाद झाला. तातडीने त्याचा शोध घेण्यात आला.पोलीस उपअधीक्षक डी.एम.पाटील यांनी त्याची समजूत घातली. रजाही मंजूर करण्यात आली.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: Police officer commits suicide for 'her'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.