पोलीस अंमलदाराने घराच्या प्लॉटमध्ये फुलवली भाज्यांची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:25+5:302021-03-05T04:16:25+5:30
सुमेरसिंग चौहान पोलीस मुख्यालयात कार्यरत असून गणेश कॉलनीला लागूनच असलेल्या रेल्वे कॉलनीत ते वास्तव्याला आहेत. घराच्या शेजारीच अडीच हजार ...
सुमेरसिंग चौहान पोलीस मुख्यालयात कार्यरत असून गणेश कॉलनीला लागूनच असलेल्या रेल्वे कॉलनीत ते वास्तव्याला आहेत. घराच्या शेजारीच अडीच हजार क्षेत्रफळाचा प्लॉट त्यांनी विकत घेतला आहे. या प्लॉटमध्ये शेपू,पालक, मेथी, कांदे, टमाटे, पत्ता कोबी, फुलकोबी, बटाटे, बीट, गाजर, पुदीना, कढी पत्ता, पोथीचे पाने, मुळा, गिलके, गवती चहा, अडूळसा, कोथिंबीर, मिरची, अंजीर, वांगे या भाज्यासह पपई व आंबा आदी फळांची त्यांनी लागवड केली आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी ही शेती तयार केली. दोन महिन्यापासून भाज्यांचे उत्पादन यायला लागले आहे. भाज्या पूर्णपणे सेंद्रिय असल्याने त्याचा एक मोठा फायदा आहे. पहूर, ता.जामनेर व खर्ची, ता.एरंडोल येथून भाज्यांचे रोप व बियाणे आणल्याची माहिती चौहान यांनी दिली.
रोज दोन तास मेहनत
भाज्यांना पाणी देणे, तण काढणे व इतर कामांसाठी रोज सकाळी १ तास व संध्याकाळी १ तास मेहनत घ्यावी लागते. या प्लॉटला वॉल कंपाऊंड करण्यात आल्यामुळे गुरे, ढोर तसेच इतर कोणाचा वावर नाही. विशेष म्हणजे मनपाकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरच हा भाजीपाला फुलविला जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आता थोडे जास्तीचे पाणी लागेल. पाण्यासाठी स्वतंत्र दोन टाक्या ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कोट..
सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला फुलविण्यात आला आहे. बाहेरुन भाजी विकत घेण्याची वेळच येत नाही. कोरोनामुळे आधीच बाजारात जायला निर्बंध आहेत. ड्यूटी संपल्यावर याच प्लॉटवर थोडा वेळ मेहनत घेतल्याने मनही प्रसन्न होते व रोज ताजी भाजी मिळते. रोज तीन ते चार भाज्या निघतात. ज्यांच्याकडे असा मोकळा प्लॉट आहे, त्यांनी असा प्रयोग करावा.
- सुमेरसिंग चौहान, पोलीस हवालदार, मुख्यालय.