पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:55 AM2020-06-02T11:55:36+5:302020-06-02T11:55:50+5:30
गुन्हा दाखल : तीन महिन्याची गर्भवती राहिली तरुणी, लग्नानंतर प्रकार उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतात कापूस वेचण्याच्या कामाला येत असलेल्या तरुणीवर शेत मालक व जिल्हा पोलीस दलातील हवालदार कैलास तुकाराम धाडी (रा.लोणवाडी, ता.जळगाव) याने अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी तीन महिन्याची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पीडितेच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास धाडी हा लोणवाडी येथील रहिवाशी आहे. आॅक्टोबर २०१९ मध्ये गावातील १९ वर्षीय तरुणी त्याच्या शेतात कापूस वेचण्याच्या कामासाठी आलेली असताना विहिरीवर पाणी घेण्यासाठी जात होती. त्या वेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये कैलास याने पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तिला दिली.
त्यामुळे पीडितेने या प्रकाराची वाच्यता केली नाही. मध्यंतरीच्या काळातही कैलास याने सतत त्याच पत्र्याच्या खोलीत वारंवार अत्याचार केला.
विवाहानंतर फुटले बिंग
या घटनेनंतर २४ मे २०२० रोजी पीडित तरुणीचे लग्न झाले. २८ मे रोजी त्रास होत असल्याने पती व सासरच्यांनी तिला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात नेले असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. तेव्हा पीडितेने झाल्या प्रकाराची पती व सासरच्यांना माहिती दिली. रविवारी पीडिता माहेरी आली असता कुटुंबाला घेऊन तिने रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. झाल्याप्रकाराची माहिती कथन केल्यानंतर मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेची फिर्याद घेतली. तेव्हा मध्यरात्री कैलास तुकाराम धाडी याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व कॉन्स्टेबल रतिलाल पवार करीत आहेत. दरम्यान, कैलास याच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धाडीची कारकिर्द वादग्रस्त
कैलास धाडी हा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. २०१८ मध्ये त्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून पहूरला बदली झाली होती. मात्र तो पहूर येथे हजरच झाला नाही. त्यामुळे त्याची मुळ नेमणूक कुठे आहे, हेच स्पष्ट होत नाही. असे असताना त्याचे वेतन व इतर भत्ते मात्र नियमित निघत आहेत. मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांचीही भूमिका यात संशयास्पद आहे. धाडी याच्याविरुध्द याआधी देखील गुन्हे दाखल आहेत.