एसीबीचे व्हाइस रेकाॅर्डर घेऊन पसार झालेला पोलीस अंमलदार अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:45+5:302021-05-28T04:13:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाचेची कारवाई करताना एसीबीचे व्हॉइस रेकॉर्डर घेऊन पसार झालेला धरणगाव पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाचेची कारवाई करताना एसीबीचे व्हॉइस रेकॉर्डर घेऊन पसार झालेला धरणगाव पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार विलास बुधा सोनवणे याला गुरुवारी सायंकाळी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळून अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हवालदार दिनेशसिंग पाटील यांनी सोनवणे याला जेरबंद केले.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील भारत छगन पाटील यांच्याविरुद्ध भगवान हरी पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यात ते जामिनावर सुटले होते. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, तुला निर्दोष सुटायचे असेल तर मला १९ हजार रुपये दे अन्यथा कोर्टात कडक रिपोर्ट पाठवेल, असा दम पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यांनी भारत पाटील यांना दिला होता. भारत पाटील यांनी ५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विलास सोनवणे याने भारत पाटील यांना पैसे देण्यासाठी ६ मार्च रोजी संध्याकाळी अमळनेर बसस्टँडजवळ बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंच घेऊन भारत पाटील यांच्या गळ्यात व पॅन्टच्या खिशात व्हॉइस रेकॉर्डर ठेवून ६ मार्च रोजी रात्री १० वाजता बाजार समितीच्या गेटजवळ सापळा रचला होता. भारत पाटील याने काही रक्कम कमी करा असे सांगितले तेव्हा विलासने तुम्हाला जे द्यायचे ते द्या असे नाराजीने सांगितले आणि त्याला संशय आल्याने त्याने भारतच्या छातीस हात लावून तपासणी केली असता त्याला सरकारी व्हॉइस रेकॉर्डर हाती लागले. विलासने झटापट करून व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून बुलेटवर वेगाने पळून गेला होता.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
पथकाने विलासचा शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही म्हणून निरीक्षक नीलेश लोधी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, सोनवणे याचा जिल्हा सत्र न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.