तामसवाडी येथील पोलीस पाटील व कुटुंबियांवर दारू विक्रेत्यांकडून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 09:02 PM2020-04-13T21:02:00+5:302020-04-13T21:02:06+5:30
जीवघेणी मारहाण, तिघे जखमी : दारु विक्रीस विरोध केल्याने काढला वचपा
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात गावठी दारू तयार करून विक्री करू नका असे सांगितल्याच्या रागातून तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील पोलीस पाटलांच्या कुटुंबावर दारू विक्रेत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या पोलीस पाटील, त्यांची आई , पत्नी जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पत्नीच्या पोटात विक्रेत्यांनी लाथा मारल्याने त्या तीन ते चार तास बेशुद्ध होत्या. याप्रकरणी हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामसवाडी येथे किरण भिल हे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. गावात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने गावात स्थापन केलेल्या समितीचे ते सचिव आहेत. गावातील रामसिंग सोनवणे हा गावठी दारूची विक्री करीत असल्याने त्याचेवर मेहूणबारे पोलीसात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. रविवार (ता.१२) रोजी रात्री नऊच्या सुमारास सोनवणे याच्या घरासमोर तीन ते चार अनोळखी लोक दिसून आले. त्यांना हटकले असता ते पळून गेले. त्यावेळी पोलीस पाटील हे रामसिंग सोनवणे यास घरासमोर गर्दी करू नको असे सांगण्यास गेले असता तुझ्यामुळे आमचा धंदा बुडत आहे असे सांगत शिवीगाळ केली. तसेच रामसिंग व त्याचा मुलगा अप्पा हे दोघे त्यांच्या अंगावर धावून गेले व लाथाबु्क्यांनी मारहाण केली. याबाबत किरण भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामसिंग सोनवणे, अप्पा सोनवणे, राजु सोनवणे, शाम सोनवणे, आकाश मेस्त्री, अविनाश सुरेश मेस्त्री सर्व रा. तामसवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई व पत्नीलाही केली मारहाण
किरण भिल यांना मारहाण होत असताना त्यांची आई अनिताबाई व पत्नी रूपाली ह्या त्यांना वाचविण्यासाठी धावत आल्या असता रामसिंग व इतरांनी त्यांच्या आई व पत्नीसही मारहाण केली.