नेरीनाका भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:39+5:302021-07-10T04:12:39+5:30
जळगाव : नेरीनाका भागातील दर्शन भरीत सेंटरच्या बाजूला तळमजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता ...
जळगाव : नेरीनाका भागातील दर्शन भरीत सेंटरच्या बाजूला तळमजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या १२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनास्थळावरून ९० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेरीनाका परिसरातील दर्शन भरीत सेंटरच्या बाजूला तळमजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुरुवारी दुपारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस लीलाधर कानडे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या़ त्यानुसार कुमार चिंथा व शनिपेठ पोलिसांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास नेरीनाका परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा मारला़ त्यावेळी पोलिसांनी १२ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
मोबाईल, दुचाकी, फॅन जप्त
पोलिसांनी बाराही जणांची अंगझडती घेतली़ यात त्यांच्याजवळून रोकड तसेच सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सोबतच दोन दुचाकी, सात गाद्या व चार फॅन असा एकूण ९० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
जुगार खेळताना आढळून आलेल्या १२ जणांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक गिरीश पाटील यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गजानन चौधरी, जितेंद्र चौधरी, नंदकिशोर चौधरी, बापू मराठे (रा. तुकाराम वाडी), किरण नेमाडे (रा. ईश्वर कॉलनी), राकेश महाजन (रा. कांचननगर), अंकात चौधरी (रा. गोपाळपुरा), मनोज ऊर्फ महेश भांडारकर (रा. कासमवाडी), नरहर इंगळे, विजय सोनवणे (रा. वाल्मीकनगर), पुरुषोत्तम मराठे (रा. कासमवाडी), पंकज पाटील (रा. दांडेकरनगर) यांचा समावेश आहे.
यांनी केली कारवाई
सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गणापुरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे, मुकुंद गंगावणे, रवींद्र पाटील, किरण वानखेडे, विजय काळे, रवींद्र मोतीराया, अमोल करडईकर, महेश महाले आदींनी ही कारवाई केली आहे.