अवैध ऑनलाइन लॉटरी दुकानांवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 09:05 PM2021-03-06T21:05:09+5:302021-03-06T21:05:19+5:30

२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त : चार दुकानांवर कारवाई

Police raid illegal online lottery shops | अवैध ऑनलाइन लॉटरी दुकानांवर पोलिसांचा छापा

अवैध ऑनलाइन लॉटरी दुकानांवर पोलिसांचा छापा

googlenewsNext

जळगाव : जुने बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैैध चार ऑनलाइन लॉटरी दुकानांवर गुरुवारी दुपारी शहर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी १४ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुने बसस्थानक परिसरातील एका गाळ्यामध्ये गजानन लॉटरी, जय वाल्मीक लॉटरी, साईनाथ लॉटरी यासह आणखी एका लॉटरीच्या दुकानावर ऑनलाइन येणाऱ्या आकड्यावर ग्राहकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच शहर पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने दुपारी ३ वाजता जुने बसस्थानक परिसरातील एका लॉटरीच्या दुकानात छापा मारला. त्याठिकाणी संतोष नामदेव खजुरे (रा.गोपाळपुरा) हा सट्टा खेळविताना आढळून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळून २८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अर्धा-अर्धा तासात पोलिसांचे छापे
दुपारी तीन वाजता पहिला छापा मारल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता लागलीच गजानन लॉटरी दुकानात छापा मारला. याठिकाणी रितेश सुभाष पांडे, गणेश श्रावण लेकुरवाळे, रमेश प्रभाकर जोशी, आकाश लक्ष्मण सोनवणे हे सट्टा खेळविताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सुमारे ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लागलीच ४ वाजता जय वाल्मीक लॉटरी येथील पोलिसांनी धाड टाकून लक्ष्मण सोनवणे, अनिल फालक, प्रदीप कोलते यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ५९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. साडेचार वाजता पुन्हा साईनाथ लॉटरी दुकानात पोलिसांनी छापा टाकल्यावर त्यांना अजय कोळी, राजू कोळी, सचिन जाधव, आकाश कोळी, अशोक मोरे, विनोद राठोड असे सट्टा जुगार खेळ खेळताना व खेळविताना आढळून आले. त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ८९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्यासह विजय निकुंभ, उमेश भांडारकर, सचिन वाघ, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, रतन गिते आदींनी केली आहे.

 

Web Title: Police raid illegal online lottery shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.