अवैध धंद्यावर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 01:09 AM2017-02-08T01:09:25+5:302017-02-08T01:09:25+5:30
आठ जण ताब्यात : डीवाय.एसपींच्या पथकाची कारवाई
जळगाव : डीवाय.एसपी सचिन सांगळे यांच्या पथकाने मंगळवारी तालुक्यातील ममुराबाद, कानळदा व भोलाणे येथे सट्टा, जुगार व गावठी दारु विक्रेत्यांविरुध्द कारवाईची मोहीम राबविली. दारु व सट्टय़ाचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून आठ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 30 हजाराच्यावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भोलाणे शिवारात तापी नदी काठावर गावठी दारु निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला असून 800 लीटर रसायन, 185 लीटर दारु असा 11 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन नंदलाल एकनाथ कोळी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच परिसरात ताराचंद भास्कर कोळी याच्या अडय़ावरही 12 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ममुराबाद येथे बसस्थानकावरच सुरु असलेल्या सट्टा पेढीवर कारवाई करण्यात आली. गणेश चौधरी व योगेश दिलीप पाटील (रा.जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. कानळदा गावात यशवंत हरचंद सोनवणे याच्यावरही कारवाई झाली. उपनिरीक्षक अशोक वानखेडे, अनिल पाटील, संदीप पाटील व संदीप पाटील (चालक) यांनी धाडसत्र राबविले.