पोलीस भरती : वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज असल्यास चाचणीत चार दिवस ‘गॅप’, उमेदवारांना दिलासा
By विजय.सैतवाल | Published: June 17, 2024 03:28 PM2024-06-17T15:28:29+5:302024-06-17T15:28:49+5:30
पावसामुळे अडथळा आला तरी पुढील तारीख
जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी वेळ मिळाली असल्यास त्या उमेदवाराला दोन्ही ठिकाणी संधी मिळण्याची सुविधा पोलीस दलाकडून उपलब्ध करून दिली आहे. यात एका ठिकाणी परीक्षा दिल्यानंतर चार दिवसांचे अंतर ठेवून त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी परीक्षा देता येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
पोलीस भरती प्रक्रियेतील या सुविधेची माहिती देण्यासाठी सोमवार, १७ जून रोजी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी १९ जूनपासून राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा सुरु होणार आहे. जळगाव जिल्ह्यात केवळ पोलीस शिपाई या पदासाठी भरती होत आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी पोलीस शिपाई, चालक, बँडस् मन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई या पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी विविध पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले आहे. त्यात राज्यभरात एकाच दिवशी मैदानी चाचणी सुरू होत आहे.
काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे अशा उमेदवरांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल तो उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी चार दिवसांचे अंतर ठेवून वेगळी तारीख देण्यात येणार आहे. या सोबतच चाचणीदरम्यान पावसाचा अडथळा आल्यास पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
लेखी पुरावा आवश्यक
दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणीवेळी पहिल्या मैदानी चाचणीस हजर असल्याबाबतचे लेखी पुरावे उमेदवाराला सादर करावे लागणार आहे. अशा उमेदवारांना पुढील तारीख मिळण्यासाठी उमेदवार वैयक्तिकरित्या त्या-त्या ठिकाणी संपर्क साधून वेळ मिळवू शकतो किंवा पहिल्या चाचणीच्या ठिकाणचे घटक प्रमुख तशी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. यात दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी, अशा सूचना वरिष्ट पातळीवरून घटक प्रमुखांना दिल्या असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.