शिक्षणासाठी सासरी जाण्यास तरुणीचा नकार, गाठले पोलीस स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:37 PM2019-04-09T12:37:33+5:302019-04-09T12:38:06+5:30
सासरच्यांचा विरोध
जामनेर : दहावीत असतांना लग्न केल्यानंतर शिक्षणाची इच्छा असुन देखील सासरचे शिकू देत नसल्याने विवाहीतेने बाहेरुन शिक्षण घेत यावर्षी बारावीची परीक्षा दिली. पुढील शिक्षण घेता यावे यासाठी सासरी जाण्यास नकार देणाऱ्या पासोडी (ता.जाफ्राबाद, जि.जालना) येथील तरुणीने सोमवारी सकाळी येथील पोलिस ठाणे गाठत आपली कैफीयत पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांचेकडे मांडली.
दोन वर्षापूर्वी या तरुणीचे आनंदखेडी (जिल्हा धुळे) येथील तरुणाशी विवाह झाला. यावेळी ती दहावीत होती. परीक्षेत तिला ८८ टक्के गुण मिळाल्याने तिने पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र सासरच्यांकडुन होत असलेला विरोध व मानसीक छळाला ती कंटाळली होती.
फत्तेपूर ता.जामनेर हे तिचे आजोळ असल्याने ती येथे काही दिवस राहिली. धाड (जिल्हा बुलडाणा) येथुन तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. मला सासरी जायचे नाही, शिकायचे आहे, असे तिने पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना सांगितले.
इंगळे यांनी तिच्या आई, वडील व आजोळच्यांना बोलावीले व तीला त्यांचे स्वाधीन केले. सासरी न जाण्याच्या निर्णयावर मात्र ती ठाम होती.