जामनेर जबरी चोरीतील साडेसहा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 08:49 PM2020-10-19T20:49:08+5:302020-10-19T20:49:54+5:30
गिरिजा कॉलनीत झालेल्या जबरी चोरीप्रकरणातील रक्कम साडेसहा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी संबंधितास सोमवारी परत केले.
जामनेर : शहरातील गिरिजा कॉलनीत झालेल्या जबरी चोरीप्रकरणातील रक्कम साडेसहा लाख रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी संबंधितास सोमवारी परत केले.
८ मे २०२० रोजी पहाटे वयोवृद्ध दाम्पत्य बळीराम माळी व मयत सुशीलाबाई माळी हे दोघे घरात झोपले असताना जीवे मारण्याची धमकी देत ८ लाख ५० हजार रुपये व सोने , चांदी असा ऐवज चोरून नेल्याची तक्रार जामनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
चोरीनंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासाची चक्र फिरवीत अनेक संशयितांची चौकशी केली. परंतु पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत आरोपींना जेरबंद करून चोरीतील ६ लाख ६६ हजार ८६५ रु मुद्देमाल जप्त करण्यात आले होते. आरोपी सय्यद मोइजोद्दिन (उर्फ पुतळ्या) सय्यद मोकीमुद्दीन रा.जामनेर, आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे रा.भुसावळ, अमोल एकनाथ वाघ रा.तोंडापूर, ता.जामनेर, वसीम अहमद पिंजारी रा.मच्छीमार्केट, भुसावळ, जितू जितेंद्र किसन गोडाले रा.भुसावळ, सद्दाम शेख यासीन रा.जामनेर, शेख वसीम शेख कबिरुद्दीन रा.जामनेर यांनी फिर्यादी व त्यांची पत्नी यांना धमकी देऊन त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम रुपये असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी व सपोनि धरमसिंग सुंदरडे, रियाज शेख, अमोल घुगे, सोनासिंग ढोबाळ यांनी सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपींकडून ६ लाख ६६ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. १९ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीस पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पोलीस ठाण्यात बोलावून हस्तगत केलेली रक्कम परत दिली. दुर्दैवाने फिर्यादी बळीराम माळी यांच्या पत्नी सुशीलाबाई माळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.