पोलीस कॉन्स्टेबल यांच्या घरातून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 09:39 PM2021-05-27T21:39:21+5:302021-05-27T21:39:45+5:30
अयोध्या नगरात राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल दिपक रावसाहेब जगताप यांच्या राहत्या घरातून २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : धुळेरोडवरील अयोध्या नगरात राहणाऱ्या शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दिपक रावसाहेब जगताप यांच्या राहत्या घरातून २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता दिपक जगताप हे धुळे येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी जात असताना घराला कुलूप लावून त्याची चावी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांचेकडे दिली होती. २६ रोजी रात्री घरी परत आल्यावर जगताप यांना घराचे दार उघडे दिसले. कुलूप बाहेर भिंतीवर ठेवलेले होते. घरातील लाकडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते. या कपाटातील एक लाख ६८ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किंमतीची चार ग्रॅम कानातील टॉप्स, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची चेन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
यावेळी एकाकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्यावर जगताप यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दिपक जगताप यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७नुसार गुन्हा दाखल झाला आहे.