कंत्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:29 AM2019-03-01T11:29:28+5:302019-03-01T11:29:53+5:30
एकाच जागेवर तीन अपघात
जळगाव : खड्डयात दुचाकी घसरुन डोक्याला मार लागल्याने बिपीनसिंग राजरमन सिंग (३२, रा. पंढरपुरनगर, एमआयडीसी जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खड्डे खोदणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शेकडो कामगारांनी गुरुवारी सकाळी मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसीतील इंद्रायणी पॉलीमर या चटई कंपनीत ठेकेदार असलेला बिपीन सिंग राजरमन सिंग हा तरुण बुधवारी रात्री साडे दहा वाजता कुसुंबा येथून दुचाकीने (क्र.एम.एच. १९ डब्लु. ६०६८) घरी जात असताना एमआयडीसीतील तुलसी पाईपनजीक एफ सेक्टरमधील महालक्ष्मी दालमिल व चिन्मय एन्टरप्रायजेस या कंपनीसमोर रस्त्यावर गतिरोधकासारखा उंच खड्डयावर दुचाकी घसरुन कोसळला. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने प्रंचड रक्तस्त्राव झाला. त्यावेळी परिसरातील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. बिपीन सिंग याच्या मोबाईलवर पत्नीशी संपर्क साधला. त्यामुळे पत्नी अलका हिने बिपीस सिंगचे मित्र रमेश प्रेमपाल मिधा व अनिल बुधसिंग कुशवाह यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठून जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉ.स्वप्नील कळसकर यांनी बिपीनसिंग याला मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर आणला मृतदेह पोलीस ठाण्यात
रस्त्यात खोदलेल्या खड्डयामुळे बिपीससिंग याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष ललनसिंग यादव, के.सी.पांडे व अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जण एकत्र आले. शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी १० वाजता मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तेथे रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिसांकडे मागणी केली. तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात याच कारणावरुन वाद सुरु होता. ललनसिंग व सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांची भेट घेतली. कंत्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह तेथून हलविण्यात आला. दरम्यान, बिपीनसिंग याच्यावरमध्य प्रदेशातील रिवा या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, मृत झालेला बिपीस सिंग हा उत्तर भारतीय संघाचा कार्यवाहक होता.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हे.कॉ.भरत लिंगायत तपास करीत आहेत.
घटनेनंतर खड्डयाची दुरुस्ती करणाºयांना पिटाळले
या घटनेनंतर औद्योगिक विकास महामंडळाचे कंत्राटदार एस.जी.भंगाळे यांनी सकाळी सात ते आठ मजुर पाठवून पाईपासाठी खोदून उंच झालेल्या खड्ड्याची दुरुस्तीसाठी पाठविले. हा प्रकार समजताच चटई कामगार व उत्तर भारतीय संघाच्या लोकांनी घटनास्थळी भेट घेऊन दुरुस्ती करणाºयांना पिटाळून लावले. यावेळी काही जणांना मारहाण झाल्याचेही सांगितले जात होते, मात्र ललनसिंग यांनी त्याचा इन्कार केला आहे. घटनास्थळावरुन काही मजुर पळून गेल्याने दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.
पत्नी सात महिन्याची गरोदर
बिपीस सिंग मुळचा उत्तर प्रदेशातील असून दहा वर्षापासून जळगावात स्थायिक होता. पत्नी अलका सात महिन्याची गरोदर आहे. त्यामुळे प्रसुतीसाठी २ मार्च रोजी तो पत्नीला मुळ गावी सोडायला जाणार होता. तत्पूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. सायंकाळी मृतदेह मुळ गावाकडे रवाना झाला.
भंगाळे यांना दिला कंत्राट...
याबाबत औद्यागिक विकास महामंडळाचे उपअभियंता पी.पी.पाटील यांना विचारले असता, वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत एमआयडीसीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट एस.जी.भंगाळे यांना देण्यात आले आहे. या भागात प्रचंड पाणी साचत असल्याने या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून रस्त्यात खड्डा खोदून त्यात पाईप टाकण्यात आला आहे. काम झाल्यानंतर खड्डा बुजविण्यात आल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर खड्डा दुरुस्तीच्या कामाला होणारा विरोध व संभाव्य घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी पाटील यांनी पोलीस निरीक्षक शिरसाठ यांची भेट घेतली. कंत्राटदार भंगाळे हेदखील पोलिसात आले होते. उशिरापर्यंत गुन्हाच दाखल झाला नाही.