पोलीस उपनिरीक्षक महिलेची पर्स लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 07:06 PM2017-04-22T19:06:12+5:302017-04-22T19:06:12+5:30
पोलीस झडती घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये आल्याचे लक्षात येताच चोरटय़ाने खिडकीतून उडी घेत धूम ठोकली
जळगाव, दि. 22 - पुणे येथून जळगावला येत असताना प्रवासादरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक मीना हमजान तडवी यांची पर्स ट्रॅव्हल्समधून लांबविण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच तडवी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर ट्रॅव्हल्स थांबवून पोलीस स्टेशन गाठले. पोलीस झडती घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये आल्याचे लक्षात येताच चोरटय़ाने खिडकीतून उडी घेत धूम ठोकली. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून त्याला रेमंड चौकात लागलीच पकडले. ही घटना शनिवारी घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुणे खडका पोलीस स्टेशन उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व मूळच्या जळगावच्या रहिवासी मीना तडवी या नणंदेच्या लगAासाठी पुणे येथून ट्रव्हल्सने (क्र.एम.एच.20 डी.0523) जळगावला येत होत्या. ट्रॅव्हल्सने जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात प्रवेश केल्यानंतर तडवी व त्यांचे सहकारी झोपेतून उठले. सामान सोबत घेण्याची तयारी करीत असताना पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये 20 हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल, वाहन परवाना, बॅँकेचे एटीएम व काही रोकड होती.