चोपडा येथे जुगार व अवैध दारू अड्ड्यांंवर पोलिसांच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:57 PM2018-08-17T22:57:11+5:302018-08-17T22:57:49+5:30
चौघांना अटक, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा, जि.जळगाव : येथे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने जुगार व अवैध दारू अड्ड्यांंवर धाडी टाकून सहा आरोपींंवर कारवाई केली. यात साडेबारा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १७ रोजी दुपारी एकच्या सुमारास शहरात विविध पाच ठिकाणी जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. मुंबई दारूबंदी कायदा अन्वये १ आणि मुंबई जुगार कायदा अंतर्गत चार गुन्हे दाखल केले असून, ६९७३ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठी जप्त करण्यात आला. तसेच चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी हे कल्याण मटका नावाने सट्टा लावताना आढळले. चौघा आरोपींविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पाच हजार ७५० रुपये जप्त करण्यात आले.
याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्याद दिली. त्यावरून प्रभाकर हरी महाजन रा.चहार्डी, संदीप मधुकर पाटील, अजय मोतीलाल राजपूत, चुनीलाल बुधा पाटील रा.गुजरअळी, सुनील युवराज बाविस्कर रा.आडगाव, लाखीचंद आधार महाजन रा.चुंचाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस शिपाई नितीन वाले, पोलीस नाईक सुनील पाटील, प्रशांत वाडीले, रवींद्र ठाकरे, नितीन आगोने यांनी ही कारवाई केली.