‘ड्राय डे'च्या दिवशीही तळीराम सुसाट, १२ जण गजाआड
By विलास बारी | Published: September 29, 2023 07:18 PM2023-09-29T19:18:53+5:302023-09-29T19:20:35+5:30
१६ जणांविरुद्ध गुन्हा : सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त.
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या 'ड्राय डे'च्या दिवशी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व हातभट्टी दारू विक्रेत्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगावच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला असताना बेकायदेशीररित्या मद्य विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत जळगाव जिल्ह्यात ४८३ लिटर गावठी दारू, ३१ लिटर देशी दारू, दहा हजार ६८० लिटर रसायन व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला त्याची किंमत चार लाख २३ हजार ३३५ रुपये आहे. या प्रकरणात १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.