पोलीस बदली प्रक्रिया: वर्षानुवर्षे एका विभागात असणाऱ्या अंमलदारांना सोडावं लागणार शहर!
By विजय.सैतवाल | Published: July 10, 2024 12:07 AM2024-07-10T00:07:08+5:302024-07-10T00:07:31+5:30
पहिल्या दिवशी ७८ सहाय्यक फौजदार, १७६ पोलिस हेड कॉन्सटेबल, ६७ पोलिस नाईक अशा एकूण ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: जळगाव जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार ते पोलिस शिपायांपर्यंत कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जात असून मंगळवारी सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक पदापर्यंतच्या ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पोलिस शिपाई पदाच्या बदली प्रक्रियेसाठी बुधवारी मुलाखती होणार आहे. वर्षानुवर्षे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदली निश्चित मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीसह पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी तीन पसंतीक्रमानुसार अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर दि. ९ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोख नखाते, कविता नेरकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील बदलीसाठी पात्र सहाय्यक फौजदार, पोलिस हेड कॉन्सटेबल, पोलिस नाईक व पोलिस शिपाई या कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी मुलाखतींना मंगळवारी सुरुवात झाली. या मुलाखतींमध्ये ७८ सहाय्यक फौजदार, १७६ पोलिस हेड कॉन्सटेबल, ६७ पोलिस नाईक या अंमलदारांची मुलाखत घेण्यात आली. बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या बदल्यांसाठी मुलाखत होणार आहे.
जिल्हा पोलिस दलात काही कर्मचारी राजकीय दबाव, वैद्यकीय किंवा कौटुंबिक कारणे देवून अनेक वर्षानुवर्षे शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये बदली करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वर्षानुवर्षे येथे असणाऱ्या अमलदारांना शहराबाहेर पाठविण्याचा पोलिस अधीक्षकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांकडून पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाचे स्वागत तर काही जणांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.