पोलिसांचा वावर भाजपा पदाधिकाऱ्यांसारखा : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:20 PM2018-06-14T16:20:20+5:302018-06-14T16:20:20+5:30
सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.
जळगाव : सरकार आमचे पण होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधी पैशांची मस्ती येऊ दिली नाही व शासकीय अधिका-यांचा गैरवापर देखील केला नाही. सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा ‘ वन बुथ १५ युथ’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मेळावा झाला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक अॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदर
आपल्या भाषणात संग्राम कोते-पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत पराभवामुळे पक्ष संघटनेचे मोठे काम आमच्या समोर होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन वाढविले. त्यामुळे पक्षाने कदर केली. माझा तालुकाध्यक्ष होण्यासाठी संघर्ष सुरु असताना पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे सांगत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदर होत असल्याचे सांगितले.
विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
सध्याचे सरकार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशाच खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांचे नेहमी धमकीचे फोन
संघटना चालवित असताना पोलिसांकडून नेहमी धमकीचे फोन येत असतात. मात्र आपण घाबरणाºयांमधले नाहीत. भाजपा सरकार कडे सत्ता आहे म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. भाजपाकडे सत्तेची मस्ती आहे. त्यातूनच शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत असंवेदशनीलता निर्माण होते.
मुख्यमंत्र्यांचे खोटे बोल पण रेटून बोल
मुख्यमंत्री व पंतप्रधान हे सतत परदेश दौºयावर राहतात. मात्र त्यातून किती उद्योग आणले, किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती जनतेला द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात रोज खून, दरोडे व गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.