पोलिसाचा पुढाकार : ढोलताशा पथकाची स्थापना, मिळणा-या पैशांतून गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 11:25 AM2017-10-16T11:25:05+5:302017-10-16T11:26:46+5:30
आपल्या जन्मभूमीचे ऋण फिटावे आणि त्यासोबत सामाजिक कार्यही व्हावे आणि तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी एका पोलीस कर्मचा-याने आर्थिक भार उचलत आपल्या गावात ढोलताशा पथकाची स्थापना केली आहे.
संजय पाटील/ भातखंडे (जळगाव) - आपल्या जन्मभूमीचे ऋण फिटावे आणि त्यासोबत सामाजिक कार्यही व्हावे आणि तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी एका पोलीस कर्मचा-याने आर्थिक भार उचलत आपल्या गावात ढोलताशा पथकाची स्थापना केली आहे. यातून मिळणा-या पैशातून गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती’ या गाण्याचा प्रत्यय त्यांच्या या सामाजिक कार्यातून होत आहे.
भडगाव (गिरड) येथील रहिवासी आणि सध्या ठाणे शहर पोलिसात कार्यरत असलेले अशोक भगवान पाटील यांनी हा वेगळा प्रयोग सुरू केला आहे. नोकरी लागण्यापूर्वी १९९९ मध्ये त्यांनी गावात ढोल-ताशा पथक स्थापन केले होते. २००० मध्ये ते मुंबईत पोलिसात भरती झाले. त्यामुळे इकडे हे पथक बंद पडले. असे असले तरी संगीत आणि वाद्याची गोडी सुटली नाही. मुंबई व ठाणे येथील ढोलताशा पथकाची रचना व वाजवण्याची पद्धत त्यांनी पाहिली आणि गावाकडच्या जुन्या पथकाची आठवण आली. तेव्हाच आपल्या गिरड गावातही अशाच पथकाची स्थापना करण्याचे ठरविले. त्यासाठी दर महिन्याला पगारातून काही रक्कम बाजूला टाकण्यात आली. याशिवाय नोकरी सांभाळून ठाण्यातील ‘रौद्रसंभू’ या ढोल पथकात त्यांनी प्रवेश घेतला व जसा वेळ मिळेल तसा त्यांच्यात वादनाचा सराव सुरू केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी ते गिरड येथे आले. त्या वेळी नीळकंठ खैरनार या मित्राकडे त्यांनी ढोलताशा पथकाची संकल्पना मांडली. त्यांनी या चांगल्या कामाला होकार देत तरुणांची बैठक घेतली. आता २ आॅक्टोबर २०१७ रोजी गिरडमध्ये ‘साई गर्जना’ ढोल-ताशा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात ३५ ते ४० तरुणांना समावेश आहे. पूर्वीपासून सुरू असलेली ढोल ताशाची परंपरा जपता यावी व त्याच्यातून काही भाग उत्पन्न प्रत्येक सभासदाला मिळेलच. शिवाय गावातील गरजू मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सभासदांनी आपली नियमित कामे आणि व्यवसाय सांभाळून ढोलताशा पथकात काम करायचे आहे, असा नियमच तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सभासदाला ओळखपत्र देण्यात आले आहे. समाजाची आणि गरजूंची सेवा व्हावी, यासाठी या ढोलताशा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यातून मिळणा-या उत्पन्नातून गरजू मुला-मुलींची शाळेची फी भरण्यात येईल - अशोक भगवान पाटील, गिरड, ता. भडगाव जि. जळगाव
ढोलाताशा पथकासोबत अशोक पाटील