राजकीय घडामोडी शिवसेना स्टाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:44+5:302021-06-01T04:13:44+5:30

नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले गेले. जळगाव-मुक्ताईनगरनंतर अबकी बार भुसावळवर निशाणा साधला जात आहे. भाजपचे काही पदाधिकारी ...

Political affairs Shiv Sena style | राजकीय घडामोडी शिवसेना स्टाइल

राजकीय घडामोडी शिवसेना स्टाइल

Next

नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले गेले. जळगाव-मुक्ताईनगरनंतर अबकी बार भुसावळवर निशाणा साधला जात आहे. भाजपचे काही पदाधिकारी व नगरसेवक नजीकच्या काळामध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या कुटुंबियांनी जाहीररीत्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे पदावर आहेत ते फक्त औपचारिक असल्याचे दिसून येत आहे. निम्मे भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेले, तर भुसावळचे उरलेले काही नगरसेवक हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवबंधन बांधणार असे येथील राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

येत्या सहा महिन्यांत नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवता सत्ताधारी पक्षासोबत गेल्यास नक्कीच शहरातील विकास कामे मार्गी लागतील, अशी यामागची कारणे दिसून येत आहेत. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनीही भुसावळकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते असो की अमृत योजना प्रत्येक कामाकडे जातीने लक्ष देऊन भरघोस निधी उपलब्ध करून देत आहेत. जळगाव मुक्ताईनगरनंतर आता भुसावळ भाजपला खिंडार पडणार, असे चित्र असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.

वादळी तडाख्याने शेतकरी हवालदिल

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतांतील उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. कुणाच्या भिंती पडल्या, तर मुख्य रस्त्यावर डेरेदार झाडे उन्मळून

पडली आहेत. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनातर्फे तालुक्‍यातील काही ठिकाणी पंचनामे करण्यात आले आहेत.

कोरोना आटोक्यात

जिल्ह्यामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या भुसावळ तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून बऱ्याच अंशी कोरोना आटोक्यात आला आहे. रुग्ण नसल्यामुळे खाजगी तीन कोरोना सेंटर बंद झाले आहेत. जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहराला पाहिजे त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची फिराफिर होत आहे. सेंटरवर लस कमी व मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. भुसावळ येथील प्रत्येक सेंटरवर आलेल्या लसींचे समसमान वाटप व्हावे, म्हणजे नागरिकांची पळापळ होणार नाही.

Web Title: Political affairs Shiv Sena style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.