जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:46+5:302021-03-15T04:15:46+5:30

महापालिकेतील बलाबल भाजप - ५७ शिवसेना - १५ एमआयएम - ३ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा महापौर व ...

Political earthquake in Jalgaon Municipal Corporation | जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप

Next

महापालिकेतील बलाबल

भाजप - ५७

शिवसेना - १५

एमआयएम - ३

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीला चार दिवस शिल्लक असतानाच महापालिकेत राजकीय भूकंप झाला असून, जळगावातही सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी भाजपचे ५७ पैकी तब्बल २७ हून अधिक नगरसेवक सेनेच्या गळाला लागले असून रविवारी सायंकाळीच सहलीला रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत भाजपच्या सूत्रांनीदेखील दुजोरा दिला आहे. यामुळे भाजपचे संकटमोचक आ. गिरीश महाजन हेच अडचणीत आल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजाविण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आला असून, महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांचे नावदेखील निश्चित केले आहे.

जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. तर महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. तर १८ रोजी नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक फरार झाल्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरसेवकांची संख्या २७ पेक्षा जास्त असल्यास शिवसेनेकडून महापालिकेत सेनेचा भगवा फडकण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांच्या फार्महाउसवरून हलली सूत्रे

महापौरपदाच्या निवडीसाठी केवळ चार दिवस शिल्लक असतानाच, शिवसेनेकडून सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. रविवारी दुपारी २ वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्महाउसवर एकत्र झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ठिकाणाहूनच सेनेची सर्व सूत्रे हलली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. तसेच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.

‘सांगली पॅटर्न’ची चर्चा

सांगली महापालिकेतही भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादीने भाजपच्या ७ नगरसेवकांना निवडणुकीपासून दूर ठेवून महापालिकेत भाजप उमेदवाराचा ३ मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचा महापौरपदाचा उमेदवार निवडून आणला. हाच सांगली पॅटर्न जळगाव महापालिकेतदेखील शिवसेनेकडून राबविण्यात येत असल्याची चर्चा आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत या पॅटर्नचे खरे मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा सांगली पॅटर्न कितपत यशस्वी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन

भाजपचे नगरसेवक फरार झाल्याची चर्चा सुरू होताच शिवसेनेच्या नगरसेवकांची लढ्ढा फार्म येथे बैठक झाली. या बैठकीत महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, इब्राहिम पटेल आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आला असून, शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन यांना उमेदवार म्हणूनदेखील निश्चित केले आहे. मात्र, उपमहापौरपदाचा उमेदवार सेनेकडून जाहीर करण्यात आला नसला तरी कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

Web Title: Political earthquake in Jalgaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.