राजकीय नेते सक्रीय; कार्यकर्ते उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 04:21 PM2018-10-14T16:21:33+5:302018-10-14T16:21:57+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ज्यांच्या भेटीसाठी अनेकदा पाठपुरावा करावा लागतो, ते नेते गावात येऊन ‘सेल्फी’ काढून घ्यायला प्रोत्साहन देतायत. पण कार्यकर्ता हुशार झाला आहे.
मिलिंद कुळकर्णी
निवडणुका तोंडावर आल्यानंतर बूथपातळीपासून कार्यकर्त्यांची रचना लावण्याचे राजकीय पक्षांचे संघटनात्मक कार्य सुरु झाले आहे. परंतु कार्यकर्ता अनुभवाने शहाणा झाला आहे. चार वर्षातील कडूगोड आठवणी त्याच्या गाठीशी आहेत. निष्ठावंत वगैरे शब्द नेत्यांप्रमाणे त्यालाही प्रिय आहे, पण व्यवहार वेगळा असतो, ही शिकवण त्याला नेत्यांनीच दिलेली आहे.कार्यकर्त्यांचा बदललेला नूर पाहून राजकीय पक्ष आणि नेते हबकले आहेत. पदे रिकामी आहेत, कुणी घ्यायला तयार नाहीत. खाजगी संस्थांची मदत घेऊन निवडणुका लढवाव्या लागण्याची दाट शक्यता आहे.
मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत. हिंदी भाषिक पट्टा, दक्षिण आणि पूर्वांचल अशा देशातील विभिन्न भौगोलिक पट्टयात होणाऱ्या या निवडणुका भारतीय मतदारांचा कल दर्शविणाºया ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे बघितले जात आहे.
गुजरात आणि कर्नाटकच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरणात बदल दिसून येत आहे. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही वाटत असताना कर्नाटकच्यानिमित्ताने विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. राफेलने वातावरणात अधिक रंग भरला आहे. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुका आणि त्यानंतर तीन महिन्यात होणाºया लोकसभा निवडणुकांच्यादृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
खान्देशचा विचार केला तर भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहणारा विभाग अशी त्याची ओळख आहे. राष्टÑवादी काँग्रेसचा दबदबा कमी झाल्याचे २०१४ नंतर दिसून आले. त्यात फार काही फरक पडलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहिले आणि राष्टÑवादीच्या नेत्यांनी केलेली पक्षांतरे पाहिली तरी या निष्कर्षाला पुष्टी मिळते. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी महिनाभरात केलेले दौरे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी पुरेसे ठरतील, असा प्रयत्न दिसून येतो. सुळे यांनी चार दिवस जळगाव जिल्ह्यासाठी दिले याविषयी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. सुळे खासदार असल्या तरी पुढे राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे या अधिक स्वीकारार्ह नेत्या राहू शकतात, असा संदेश देण्याचा प्रयत्न राज्यस्तरीय संवाद दौºयातून दिला जात आहे, असा अंदाज बांधला जात आहे. युवती मेळावा, समाजातील उद्योजक, व्यावसायिकांशी संवाद, पक्षाची आढावा बैठक, महत्त्वाच्या स्थळांना भेटी, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद असे त्यांच्या दौºयाचे स्वरुप लक्षात घेता, त्या महाराष्टÑाची सूक्ष्मपणे माहिती घेत आहेत, असेच जाणवते.
यापूर्वी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही असाच दौरा केला होता. पक्षस्थापनेपूर्वी ‘ब्ल्यू प्रिंट’ बनविण्यासाठी प्रवास असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती. त्यामुळे असा दौरा करणे कोणत्याही राजकीय नेत्याच्यादृष्टीने चांगले आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात त्याचा कितपत उपयोग होतो, याविषयी शंका आहे. ज्याठिकाणी पक्षाची अवस्था नाजूक असताना त्याठिकाणी उपचार, दवापाण्याची गरज असताना असे दौरे हे नेत्याला लाभदायी असले तरी कार्यकर्त्यांना केवळ दिलासा देणारे ठरतात, हे सत्य नाकारुन चालणार नाही.
कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे तसेच झाले. वर्षभरापूर्वी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी मिळून यात्रा काढली होती. त्या आणि या यात्रेत काही फरक नव्हता. कर्जमाफी, सामाजिक सौैहार्द आणि आता राफेल याविषयांवर कॉंग्रेसने जोर दिला. सर्व समाज घटक नाराज असल्याचे दोन्ही काँग्रेस सांगत असले तरी मतदार भाजपालाच का निवडून देतात, याचे उत्तर नेत्यांकडे नाही. केवळ मतदानयंत्राला दोष देऊन चालणार नाही.
भाजपाने काँग्रेसच्या ६० वर्षांचा तर काँग्रेसने भाजपाच्या चार वर्षांच्या राजवटीचा हिशोब मागितला, तरी त्याने मतदारांचे समाधान होणारे नाही. हे दोघांनी लक्षात घ्यायला हवे.
राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांशी साधलेला सुसंवाद हा आश्वासक उपक्रम होता. पदाधिकाºयांना सतर्क आणि सजग राहण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. पक्ष पाठीशी आहे, अशी भावना जर कार्यकर्त्यांमध्ये राहिली तर तो पूर्णशक्तीने लढतो. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या दौºयातील हे साम्य निवडणुकीची चाहूल दर्शविणारे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दौºयात वचनपूर्तीवर अधिक भर दिला असला तरी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले आहे. दुसरीकडे पक्षाच्या खासदार, आमदार यांना त्यांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक देऊन आरसा दाखविला आहे. नापास, टांगती तलवार असे म्हणण्यात अर्थ नसला तरी विद्यमान लोकप्रतिनिधीला कामाची गती वाढवा, सरकारच्या उपाययोजना लाभार्थीपर्यंत पोहोचवा, असा संदेश त्यातून दिला आहे. पक्षाकडे पर्याय तयार आहे, तुम्ही काम करा, अन्यथा ...असा इशारा या कृतीतून दिसून येतो.
शिवसेना मात्र महापालिका निवडणुकीच्या पराभवातून अजून बाहेर आलेली नाही. संपर्क नेत्यांचे दौरेदेखील थांबलेले आहेत. इच्छुक पुन्हा थंडावले आहेत. कार्यकर्ते आदेशाची वाट पाहत आहेत. पुढील सहा महिने नेत्यांसाठी धावपळीचे तर कार्यकर्त्यांना महत्त्व प्राप्त करुन देणारे ठरणार आहेत.
काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांशी सुसंवाद साधणे, मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठका, उद्घाटनांच्या माध्यमातून जळगावसाठी पूर्ण दिवस देणे, जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांची उपस्थिती, खासदार सुप्रिया सुळे यांचा चार दिवसांचा संवाद दौरा या घडामोडी निवडणुकीची चाहूल लागल्याच्या निदर्शक आहेत. प्रयत्न चांगला आहे. आरोप-प्रत्यारोप करत असताना आपण काय केले हे जर सांगितले गेले तर जनतेला विश्वास वाटू शकेल.
आयाराम-गयाराम
राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘आयाराम-गयाराम’ हे आहे. पक्षाला आयते यश हवे आहे. त्यासाठी परिपूर्ण उमेदवार आयात करुन यश पदरात पाडून घेतले जाते. परंतु पक्षासाठी खस्ता खाणारा दूरच राहतो. त्याला बळ दिले जात नाही.