जिल्हा परिषदेतील राजकीय वादळ शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:23+5:302021-05-03T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अविश्वास ठरावाचे गणित जुळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी निर्माण झालेले राजकीय वादळ शांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अविश्वास ठरावाचे गणित जुळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी निर्माण झालेले राजकीय वादळ शांत झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीनेही यात आता माघार घेतल्याचे चित्र असून, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी केवळ ही वातावरण निर्मिती होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला बहुमत राखता आले नव्हते. मात्र, काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आली. यात चार सदस्यीय काँग्रेस पक्षाला एक सभापतीपदही देण्यात आले होते. मात्र, ज्यांना सभापतीपद मिळाले, ते अडीच वर्षांनंतरच्या निवडणुकीत भाजपच्या गोटात दाखल झाले व अगदी सत्तांतराच्या जवळ असलेल्या सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यातील सत्तांतरानंतर सर्वात आधी जिल्हा परिषदेत सत्तांतर होईल, असे वारे निर्माण झाले होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एक-एक सदस्य फुटले आणि महाविकासचे हे गणित फसले व पुन्हा भाजपची सत्ता आली.
महापलिकेनंतर जिल्हा परिषदेत जोर
महापालिकेत झालेल्या ऐतिहासिक सत्तातरानंतर जिल्हा परिषदेतही महाविकासची सत्ता आणण्यासाठी गटनेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. यासाठी सुरूवातीला एकनाथराव खडसे, त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यात आली होती. यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत महाविकासच्या सदस्यांनी बहिष्कारास्त्र अवलंबले होते. मात्र, या सभेनंतर ठोस कसलीही पावले उचलण्यात न आल्याने या राजकीय वादळाला ‘ब्रेक’ लागला आहे.
कोरोनाने बंधने
कोरोना जिल्हा परिषदेत उपस्थितीवर बंधने आणली आहेत. जिल्ह्यात सर्वत्रच रुग्णसंख्या वाढत असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांवरही बंधने आली आहेत. अशातच आता महिनाभर तरी कोणतीही सभा नसल्यामुळे राजकीय वातावरण शांतच राहणार आहे. शिवाय गणित जुळवणे शक्य नाही, असे खुद्द काही सदस्यच सांगत आहेत. त्यामुळे आगामी ८ महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकांवरच त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
भाजपला निवडणुका कठीण
पुढील निवडणुका या भाजपसाठी कठीण असतील, असा संदेश विरोधक देत आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आताही पडद्यामागून महाविकासच्या हातात हात देत आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये तर ते स्पष्टपणे आमच्यासोबत राहतील, असा दावा काही विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी राहणार नाही.