राजकीय दौरे आटोपले, आता बंधने तर येणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:05+5:302021-06-29T04:13:05+5:30

कोरोना संसर्ग कमी होणे हे सर्वांसाठी दिलासादायकच आहे. मात्र हा संसर्ग कमी झाला म्हणजे राजकीय मंडळींच्या दौऱ्यांना वेग येतो. ...

Political tours are over, now restrictions will come! | राजकीय दौरे आटोपले, आता बंधने तर येणारच !

राजकीय दौरे आटोपले, आता बंधने तर येणारच !

Next

कोरोना संसर्ग कमी होणे हे सर्वांसाठी दिलासादायकच आहे. मात्र हा संसर्ग कमी झाला म्हणजे राजकीय मंडळींच्या दौऱ्यांना वेग येतो. (अनेक वेळा निर्बंधादरम्यानही त्यांना बंधने नसतात.) हे दौरे झाले की पुन्हा निर्बंध लागू होणे, हा अनुभव आता वारंवार येऊ लागला आहे. त्यामुळे वारंवार निर्बंध लावण्यापेक्षा सामान्यांना नियमांचे पालन करण्याचे ज्याप्रमाणे निर्देश दिले जातात, त्याचप्रमाणे राजकीय मंडळींच्या दौऱ्यांवरही निर्बंध लावल्यास सर्व काही सुरळीत चालण्यास मदत तर होऊ शकेल, असा सूर आता सर्वच क्षेत्रातून पुढे येऊ लागला आहे. मात्र तसे न होता दररोज रोजंदारी करून पोट भरणाऱ्या, सव्वा वर्षांपासून व्यवसायात फटका सहन करणारे व्यावसायिक, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच घरी राहण्याचा अजब सल्लाच जणू वारंवारच्या आदेशाने दिला जात आहे. कोरोनाची पहिला लाट ओसरल्यानंतर सर्वच जण आनंदी झाले व कोरोना गेला म्हणून प्रत्येकाचे फिरणे-हिरणे, धार्मिक भेटी-गाठी सुरू झाल्या. मात्र हा संसर्ग कमी झाल्याने या काळात ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाली व प्रत्येक राजकीय पक्षाने आपली ताकद लावत ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी नियमही धाब्यावर बसविले. याच काळात मोठी गर्दी उसळली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजकीय दौरा झाला आणि अनेकांना संसर्ग झाला. यातूनच मोठी लाट उसळली. याच काळात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दौरे केले. मात्र या निर्बंध काळात सामान्य माणूस, व्यावसायिक घरात बसले होते. यामुळे पुढे हा संसर्ग कमी झाला. मात्र आता संसर्ग व मृत्यूही रोखण्यास प्रशासनास यश आले खरे व कोरोनापासून दिलासा मिळाल्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले. हे होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा राजकीय दौरा झाला. त्यानंतर आता निर्बंध शिथिल होताच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजकीय दौरा आटोपला. त्यानंतर काही दिवसांत राज्य सरकारने सर्वच शहरे डेल्टाच्या नावाखाली तिसऱ्या टप्प्यात टाकली व व्यवसायांवर बंधने आणली. हे सर्व राजकीय दौरे पाहता, संसर्ग कमी होऊ द्यायचा, आपले दौरे करून घ्यायचे व पुन्हा सामान्य, व्यावसायिक, रोजंदारी करणारे मजूर यांच्या माथी बंधने मारायची, हे नित्याचे झाले. त्यामुळे सामान्यदेखील याला कंटाळले आहे, मात्र करणार काय? सरकारच्या बंधनापुढे कोणाचे काय चालणार या विचाराने सर्वच जण शांत आहे. मात्र सामान्यांना वेठीस धरण्यापेक्षा, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यापेक्षा, व्यावसायिकांना आर्थिक संकटात ढकलण्यापेक्षा वर्ष-दोन वर्ष राजकीय दौरेच थांबविले तर कोरोनावर नियंत्रण मिळविता येणार नाही का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या प्रत्येक राजकीय मंडळींच्या दौऱ्यादरम्यान कोठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही की मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नाही. त्यामुळे या गर्दीवर प्रशासनाने नियंत्रण मिळविल्यास कोरोनाला काही तरी आळा बसण्यास मदत होऊ शकेल, हे कोणीही सांगू शकेल.

Web Title: Political tours are over, now restrictions will come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.