बुवाबाजी थांबविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज : डॉ.व्ही.आर.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:08 PM2018-06-01T22:08:13+5:302018-06-01T22:08:13+5:30
जळगावात अंनिसच्या कार्यशाळेचे उद्घाटन
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१ : भीती आणि भावनांचा बागुलबुवा जनतेच्या मनात निर्माण करीत त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण करणाऱ्या बुवाबाजीच्या विरोधात राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती कृतीत यायला हवी असे प्रतिपादन दलितमित्र डॉ.व्ही.आर.पाटील यानी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या जिल्हस्तरिय संघटना बांधणी संवाद कार्यशाळाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रशिक्षक इचलकरंजीचे सुनील स्वामी, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, शहादाचे विनायक साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दिगंबर कट्यारे उपस्थित होते.
जागतिक प२र्यावरण दिनाच्या पार्श्वभूमिवर शिबिराचे उद्घाटन झाडाला पाणी देवून झाले. जिल्हास्तरीय पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध सामाजिक संघटनानी अंनिसला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी डॉ.व्ही.आर.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पीयूष तोड़कर यांनी केले.
पहिल्या सत्रात ‘अंनिस म्हणजे काय रे भावा’ या विषयावर कार्यवाह सुनील स्वामी यांनी २९ वर्षाची वाटचाल सांगितली. दुसºया सत्रात ‘चार महत्वाच्या गोष्टी पाच मिनीटात’ या विषयी विनायक साळवे यांनी कार्यकर्त्यांना कौटुंबिक, सामाजिक पातळीवर कसे वागावे, अंनिसचे बलस्थान, जादूटोनाविरोधी कायदा व जातपंचायत विरोधी कायदयाचा संघर्ष याबाबत माहिती दिली. तिसºया सत्रात ‘आमची शाखा आमची बैठक’ या विषयी डॉ.ठकसेन गोराणे मनोगत व्यक्त केले. चमत्कार सादरीकरणासह विचारांची प्रभावी मांडणी सोप्या भाषेत केली पहिजे असेही डॉ.गोराणे म्हणाले. त्यानंतर संघटनेची वैचारिक भूमिका, उपक्रमशीलता, संघटनात्मक रचना, परिचय अशा चार विषयावर गटचर्चा घेण्यात आली. शिबिरात ४५ कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी सहभाग घेतल्याचे समन्वयक विश्वजीत चौधरी यांनी सांगितले.