पोलिसांवर राजकारणी ठरले वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:46 PM2018-12-08T12:46:35+5:302018-12-08T12:48:59+5:30
असे एकही क्षेत्र नाही, की त्यात राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण झालेले नाही. प्रत्येक विभागात कार्यकारी पदावर (एक्झीकेटिव्ह पोस्टींग) नियुक्ती करायची असेल तर राजकीय शक्तीचा वापर आलाच. काही अधिकारी स्वत:हून राजकिय व्यक्तींची मदत घेतात तर कधी राजकीय व्यक्तीच विशिष्ट अधिका-यासाठी आग्रही असतात. असे जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत
सुनील पाटील
जळगाव : असे एकही क्षेत्र नाही, की त्यात राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण झालेले नाही. प्रत्येक विभागात कार्यकारी पदावर (एक्झीकेटिव्ह पोस्टींग) नियुक्ती करायची असेल तर राजकीय शक्तीचा वापर आलाच. काही अधिकारी स्वत:हून राजकिय व्यक्तींची मदत घेतात तर कधी राजकीय व्यक्तीच विशिष्ट अधिका-यासाठी आग्रही असतात. असे जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत. सरळमार्गी काम करणा-या अधिका-याला राजकीय शिफारशीची गरजच भासत नाही. त्यांना कर्तत्वाच्या जोरावर नियुक्ती मिळते नाही तर अकार्यकारी पदावर (साईड पोस्टींग) त्यांना काम करावे लागते. चोपडा शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले किसन नजन पाटील यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया भाजप पदाधिका-याची गाडी अडविल्याने वादाची ठिणगी पडली. त्यानंतर नजन पाटील यांची कॉलर पकडण्यापर्यंत भाजप पदाधिकाºयाची मजल गेली. हा वाद चिघळल्याने पाटील यांनी भाजपाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. खरे तर या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी पालक या नात्याने नजन पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणे अपेक्षित होते. परंतु, झाले उलटेच. अवैध धंद्याचे कारण देऊन नजन पाटील यांची उचलबांगडी करुन त्यांना कंट्रोल जमा केले. या कारवाईतून जिल्हा पोलीस दलात चुकीचा संदेश गेला. याआधी देखील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक संदीप पाटील पाटील यांचीही बदली अशीच राजकीय दबावातून झाली होती. या दोन्ही अधिका-यांमध्ये एका गोष्टीचे साम्य होते, ते म्हणजे दोघांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. राजकीय व्यक्ती गुन्हेगारी करुन पोलिसांवर वरचढ ठरत असतील व अशा वेळी वरिष्ठ अधिकारी खात्यातील अधिकारी व कर्मचा-यांच्या पाठीशी राहण्याऐवजी गुंडगिरी करणा-या राजकीय नेत्यांना व त्यांना आश्रय देणा-या पुढाºयांचे ऐकून कारवाई करायला लागले तर पोलिसांनी काम तरी कसे करावे. प्रत्येक ठिकाणी अवैध धंदे हेच कारण पुढे करुन पोलिसांना संशयाच्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. जिल्ह्यातील वस्तुस्थिती पाहिली तर अनेक अवैध धंद्यांमध्ये राजकीय व्यक्तींची भागीदारी आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून ते वावरत आहेत. एका तत्कालिन पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात तर अवैध धंद्यातून पक्षाचे पदाधिकारी असलेल्या काही पुढा-यांना दरमहा लाखोचा मलिदा मिळत होता, म्हणूनच दंगली व प्रतिस्पर्धी पुढा-यांवर हल्ला होऊनही निरीक्षकांची बदली झालेली नव्हती. सत्तेचा माज चढल्यामुळेच ‘खादी’तील काही गुन्हेगार ‘खाकी’वर वरचढ ठरले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनाच मदत करुन आपल्या अधिकारी व कर्मचाºयांचा बळी घेणे हे पोलीस दलाला घातक ठरणार आहे.