लोंढ्री येथील मतदान केंद्रावर मशीन बिघाडाच्या संशयाने दोन तास मतदान ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 03:47 PM2021-01-15T15:47:40+5:302021-01-15T15:48:53+5:30
मशीन बिघाड झाल्याच्या संशयाने दोन तास मतदान बंद होते
पहूर, ता.जामनेर : लोंढ्री बुद्रूक, ता.जामनेर येथील मतदान केंद्रावरील बुथ क्रमांक तीनमध्ये मशीन बिघाड झाल्याच्या संशयाने दोन तास मतदान बंद होते तर क्रमांक चार बुथमध्ये दोन जणांमध्ये किरकोळ मारहाणीच्या प्रकाराने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. याठिकाणी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
लोंढ्री येथे मतदान सकाळी सुरू असताना ७३ मतदान सुरळीत झाले. यानंतर ७४ व्या मतदानाला मशीनचे बटन न दाबले गेल्याने दोन्ही बाजुच्या उमेदवार राजमल भागवत, ललित पाटील, ज्ञानेश्वर राठोड, भागचंद चव्हाण, प्रेमसिंग राठोड यांनी मशीनवर संशय व्यक्त करून सकाळी नऊ वाजून २० मिनिटांना बुथवरील मतदान प्रक्रिया थांबविली. तासाच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी राकेश कोळी नवीन मशीन घेऊन दाखल झाले. दोन्ही बाजूच्या उमेदवारांशी चर्चा करून बॅलेट युनिटशी नवीन कंट्रोल युनिटशी जोडून मशीनची सर्वांच्या समक्ष तपासणी केली. यादरम्यान बॅलेटमध्ये बिघाड नसल्याचे दिसून आले. आधीचे मशीन सीलबंद केले व दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी मतदान सुरळीत करण्यासाठी सहमती दर्शविल्याप्रमाणे मतदान साडेअकराला निवडणूक निर्णय अधिकारी राकेश कोळी यांनी पूर्ववत केले.
बुथ क्रमांक चारमध्ये हाणामारी
बुथ तीन क्रमांकचा गोंधळ सुरू असताना बुथ क्रमांक चारमध्ये बुथ प्रतिनिधी यांच्या माहितीवरून गोंधळ होऊन दोन जणांमध्ये किरकोळ हाणामारीचा प्रकार घडल्याने याठिकाणी मतदान गोंधळामुळे काही वेळ बंद झाले. नंतर गोंधळ निवाळल्याने मतदान पूर्ववत झाले. याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद नाही.
प्रतिक्रिया
संबंधित मतदाराने चिन्हाच्यासमोरील दोन दोन वेळेस बटन दाबले व तिसरे वेळेस बटन दाबले असता मतदान पूर्ण झाले नाही. त्यामुळे मशीन संदर्भात संशयकल्लोळ निर्माण झाला. पुनर्मतदानासाठी लेखी तक्रार तहसीलदारांकडे व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
-राजमल नामदेव भागवत, एकता पॅनलचप्रमुख, लोंढ्री बुद्रूक
अधिकारी उमेदवारांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असून, मशीनविषयी निर्माण झालेला संशय अधिकाऱ्यांनी काढून मतदान सुरळीत केले आहे. त्यामुळे पुनर्मतदानाचा प्रश्न येत नाही.
-ललित कृष्णा भागवत, ग्रामविकास पॅनल प्रमुख, लोंढ्री बुद्रूक
बटन न दबले गेल्याने गैरसमज निर्माण झाला. बॅलेट युनिट नवीन कंट्रोल युनिटशी जोडून तपासणी केली. बॅलेटमध्ये तांत्रिक अडचण भासली नाही. आधीचे सीयु व बियू नवीन जोडणी करून उमेदवारांची शंका निरसन केली आणि त्यांच्या सहमतीने थांबलेली प्रक्रिया सुरळीत केली. -राकेश कोळी, निवडणूक निर्णय अधिकारी, लोंढ्री बुद्रूक