पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पुर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:51+5:302021-02-19T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील पॉलिटेक्निक आणि फार्मसीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होऊ शकतो. त्यासाठीचे अतिरिक्त तासांचे नियोजन करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील पॉलिटेक्निक आणि फार्मसीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होऊ शकतो. त्यासाठीचे अतिरिक्त तासांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे फार्मसी आणि पॉलिटेक्निकचे सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतील. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ऑफलाइन आणि ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.
सध्या महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, आता त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहेत. महाविद्यालये सुरू झालेली असली तरी अद्याप विद्यार्थी क्षमता फक्त ५० टक्केच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता येणारे आणि ऑनलाइन शिकणारे विद्यार्थी, असे नियोजन महाविद्यालयाला करावे लागत आहे.
अभियांत्रिकीत सेमीस्टर पद्धत आहे, तर फार्मसीला वार्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांचे नियोजन कठीण होत आहे. त्यात एमएसबीटीने दिलेल्या सूचना आणि निर्देशांनुसार अतिरिक्त तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे.
जिल्ह्यातील पॉलिटेक्निकची स्थिती
पॉलिटेक्निक कॉलेज २२
विद्यार्थी संख्या २,२००
प्राचार्य काय म्हणतात...
पॉलिटेक्निकचे वर्ग नियमित सुरू आहेत. मार्चपासून त्यांच्या परीक्षादेखील सुरू होतील. सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि पीडीएफच्या माध्यमातून टास्क देण्यात आले होते.
-महेंद्र इंगळे, प्राचार्य
फार्मसीचे वर्ग हे सध्या एमएसबीटीने दिलेल्या सूचनांनुसार सुरू आहेत. त्यात पहिल्या वर्गाचे अतिरिक्त तास घेतले जात आहेत. त्यासाठी प्रमाण ठरवण्यात आले आहे. काही विद्यार्थी महाविद्यालयात येण्यास सुरुवात झालेली असली तरी ऑनलाइन वर्गदेखील घेतले जातात.
-डॉ. प्रशांत अरगडे, विभागप्रमुख, फार्मसी
---
काय म्हणतात विद्यार्थी...
आधी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू होता. आता ऑफलाइन आणि ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. त्यात प्रात्यक्षिकांचेही टास्क दिले जातात. त्यामुळे अभ्यास करणे सोपे झाले आहे, तसेच काही अतिरिक्त तास घेतले जात आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो.
-अनिकेत पाटील, विद्यार्थी
फार्मसीच्या पहिल्या वर्षासाठी जादा तास घेतले जात आहेत. त्यामुळे बहुतेक अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होऊ शकतो. दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम येत्या दोन ते तीन महिन्यांतच पूर्ण होईल.
-सागर जोशी, विद्यार्थी