ममुराबाद भागातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:33+5:302021-04-11T04:15:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : परिसरातील नांद्राखुर्द, आव्हाणे, खेडी, सुजदे, असोदा गावांकडे जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची काही दिवसांपासून प्रचंड दुरवस्था ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरातील नांद्राखुर्द, आव्हाणे, खेडी, सुजदे, असोदा गावांकडे जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची काही दिवसांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रस्ते आता वाहतूकयोग्य राहिलेले नाही. शेतकऱ्यांसह वाहनधारकांना त्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत.
ममुराबादहून तापी नदीकाठावरील नांद्रा खुर्द गावाकडे जाण्यासाठी धामणगाव फाट्यावरून पक्का रस्ता उपलब्ध आहे. मात्र, त्यामार्गे गेल्यास जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा फेरा पडतो. त्यामुळे नांद्रा तसेच खापरखेडा परिसरांतील वाहनधारक थेट ममुराबादला जोडणाऱ्या मधल्या रस्त्याचा पर्याय निवडतात. याशिवाय तापी नदीच्या पलीकडे असलेली यावल तालुक्यातील थोरगव्हाण, मनवेल, साकळी येथील नागरिकसुद्धा याच रस्त्याचा वापर करतात. दुर्दैवाने मधला कमी अंतराचा हा रस्ता खूप खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे बाराही महिने हाल होताना दिसतात. लोंढा नाल्यानजीकचा काही भाग सोडला तर उर्वरित चार किलोमीटर अंतराचा रस्ता आता शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. नांद्रा तसेच ममुराबाद गावाकडील प्रत्येकी एक किलोमीटर रस्त्याची जास्तकरून दुरवस्था झाली असून, त्यावरून दुचाकी चालविणेसुद्धा कठीण झाले आहे. अशाच प्रकारे आसोदा, सुजदे, धामणगाव, खेडी-आव्हाणे गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती विदारक झाली आहे. कमी अंतराचे रस्ते खराब झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना व वाहनधारकांना फेऱ्याच्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.
ममुराबाद ते आसोदा हा रस्ता नावाला डांबरी आहे. त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता त्याच्या मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तशी मागणी परिसरातून होत आहे.
--------
फोटो कॅप्शन - ममुराबाद ते नांद्राखुर्द रस्त्याची प्रचंड दैन्यावस्था झाली असून त्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. (जितेंद्र पाटील)